Cyber Security Center Pudhari
पुणे

Maharashtra Cooperative Bank Cyber Security Center: राज्य सहकारी बँकेकडून 50 कोटींचे सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू

वाशी येथे C-SOC केंद्रातून सहकारी बँकांचे 24x7 सायबर संरक्षण; ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबईतील वाशी येथे स्वतःच्या जागेत ‌‘सहकार सुरक्षा‌’ या नावाने जागेसह 50 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीने एका सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची (सी-सॉक) उभारणी केलेली आहे.

सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही अत्याधुनिक सुरक्षा सेवा विनामूल्य देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. देशातील असे हे एकमेव उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारतीय बँकिंग व वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार, अशा हल्ल्यांमध्ये ग््रााहकांच्या पैशांचे झालेले नुकसान बॅंकांनी सोसायचे आहे. सी-सॉक उभारणीस असणारी मोठी भांडवली गुंतवणूक करून स्वत:चे सेंटर उभारणे लहान व मध्यम सहकारी बँकांना शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्याने ही सर्व सेवा ‌‘सहकाराअंतर्गत सहकार‌’ या सहकारातील प्रमुख तत्त्वांचे पालन करत उपलब्ध करून दिल्याचे समाधान राज्य बँकेस मिळाले आहे. राज्य बँकेच्या या केंद्रामध्ये बॅंकेचे 35 तांत्रिक कर्मचारी हे 24/7 वेळ कार्यरत आहेत. राज्य बॅंक सदस्य बॅंकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही राबविणार आहे.

केंद्राची मुख्य उद्दिष्टे : राज्य बँक व इतर सहकारी बँकांना ज्ञात व अज्ञात अशा दोन्ही प्रकारच्या संभाव्य सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणे. सायबर हल्ल्यांचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन त्याचे परिणामकारक नियंत्रण करणे, असे हल्ले परतविणे, संभाव्य धोक्याचे बँकांना सूचना/अलर्ट देणे. 24/7 बॅंकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणे, त्यांना संभाव्य धोक्याची वेळीच सूचना देणे.

जिल्हा बँकांनी सुविधा वापरावी: प्रवीण दराडे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुरू केलेल्या सायबर सिक्युरिटी सेंटरमुळे बँकांच्या सर्व्हरवर होणारे सायबर हल्ले रोखण्यास मोठे यश आले आहे. तरीसुद्धा अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यातील 31 पैकी जेमतेम चारच जिल्हा सहकारी बँकांनी या सुविधेचा प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्वच जिल्हा सहकारी बँकांनी राज्य बँकेच्या या सुविधेचा वापर करण्याचे निर्देश सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी दिले असल्याचेही राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT