

पुणे: केंद्र सरकारकडून अनुदानित खतांच्या वितरणासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत फर्टिलायझर सेल ॲप्लिकशन सिस्टिम (एफएसएएस) या ॲपद्वारे खते खरेदी करण्याची नवीन प्रणाली तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या आराखड्याअंतर्गत एफएसएएस हे ॲप केंद्र शासनाने तयार केले असून, या ॲपमधून शेतकऱ्यांना खतांची बुकिंग करता येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी दिली.
राज्यात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायांगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे. त्यासाठी शेतकरी व खत विक्रेत्यांना माहिती होण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत एफएसएएस हे मोबाईल बेस ॲप तयार केले आहे. या मोबाईलवरील ॲपमधून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची बुकिंग करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी क्यूआरकोडद्वारे खत बुक केल्यानंतर क्यूआर कोड तीन दिवस वैध राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतात. खतांचे ऑनलाईन बुकिंग केल्याने रांगेत उभे राहावे लागणार नाही. शिवाय आवश्यक खताचे बुकिंग केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती दुकानदाराकडून होणार नाही. त्यामुळे खत विक्रीमध्ये सुलभता व पारदर्शकता येईल.
सध्या दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे दिसून येते. या प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत. या वितरण प्रणालीची केंद्र सरकारच्या टीमने पुणे जिल्ह्यातील अष्टापूर (ता. हवेली) येथे चाचणी घेतली. दुसऱ्या टप्प्यात आता यंदाच्या खरिपात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगरात पथदर्शी प्रयोग राबवणार आहे. तरी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.