पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) विद्यार्थ्यांच्या निकालाच्या गुणपत्रकांची आणि प्रमाणपत्रांची माहिती आतापर्यंत त्रयस्थ संस्थांकडे जतन केली जात होती. परंतु, संबंधित माहिती साठविण्यासाठी राज्य मंडळ स्वतंत्र ‘डेटा सेंटर’ उभारणार आहे. या माध्यमातून 1965 सालापासून आत्तापर्यंत परीक्षा दिलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या माहितीचे जतन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ या स्वायत्त संस्थेची स्थापना 1965 मध्ये झाली आहे. राज्य मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. मुख्य परीक्षा आणि पुरवणी परीक्षा अशा वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी साधारणतः 15 लाख विद्यार्थी बारावीची आणि 17 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. त्यानंतर होणाऱ्या पुरवणी परीक्षेला एकत्रितपणे सहा लाख विद्यार्थी नोंदणी करतात.
राज्य मंडळाकडे स्वतःचे स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध नसल्याने सर्व माहिती त्रयस्थ संस्थेच्या ‘सर्व्हर’वर भाडेतत्त्वावर संकलित केली जाते. ही माहिती त्रयस्थ संस्थेकडे संकलित असल्याने कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, त्याशिवाय संबंधित संस्थेला ही माहिती त्यांच्या ‘सर्व्हर’वर भाड्याने ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे राज्य मंडळ स्वतंत्र ‘डेटा सेंटर’ उभारणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एज्यु टेक’ या कंपनीच्या साहाय्याने ‘ना नफा- ना तोटा’ तत्त्वावर राज्य मंडळाच्या भांबुर्डा येथील मुख्यालयात हे डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे.
तब्बल 80 लाख पानांच्या दस्तऐवजाचे होतंय ‘स्कॅनिंग’
राज्य मंडळाच्या स्थापनेपासून घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांची आणि प्रमाणपत्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे. आता 1965 ते 1990 या कालावधीतील माहितीच्या संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. ‘ए थी’ पानाच्या आकारातील जवळपास 80 लाख पानांचे स्कॅनिंग चालू आहे. या कामाला साधारणतः सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) यातून निधी उभारला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.
राज्य मंडळ कात टाकणार...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी विभागीय मंडळे, तसेच राज्य मंडळाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार केला आहे. परीक्षा पद्धतीमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा, मंडळाच्या इमारतींची दुरुस्ती, मंडळामध्ये मनुष्यबळाची भरती, अत्याधुनिक साहित्यांची खरेदी, परीक्षा पद्धती, तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आदी सुधारणांमुळे येत्या काळात राज्य मंडळ कात टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.