

पुणे: राज्यात उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याचे तापमान 44 अंशांवर पोहोचले असून, नागरिकांना दिवसा आणि रात्रीही उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघातसदृश त्रासामुळे दवाखाने आणि रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ त्वचा किंवा थकव्यापुरता मर्यादित नसून, डोळे, पचनसंस्था, मूत्रपिंड, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांवरही गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उष्णतेमुळे डोळे कोरडे पडणे, जुलाब-अपचन, निर्जलीकरण, मूत्रपिंडांवरील ताण, तसेच रक्तातील साखरेतील चढ-उतार अशा समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी भरउन्हात घराबाहेर पडू नये आणि सातत्याने द्रव पदार्थांचे सेवन करत राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
काय काळजी घ्यावी?
मधुमेहींनी वारंवार साखर तपासावी, भरपूर पाणी प्यावे आणि इन्सुलिन थंड ठिकाणी ठेवावे.
शरीरातले पाणी कमी होऊ न देणे. सरबत आणि लिंबूपाणी यांसारख्या घरगुती द्रवपदार्थ सातत्याने पीत राहावे.
शीतपेयांचे सेवन टाळावे. मसालेदार पदार्थ खाऊ नये.
उन्हाच्या तडाख्यात म्हणजे भर दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे.
बाहेर जाताना आपत्कालीन उपचारांचा संच सोबत ठेवावा.
उन्हाळ्यासाठी अनुकूल ठरतील असे सुती, फिक्या रंगाचे कपडे वापरावेत.
डोके झाकलेले राहतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी टोपी, स्कार्फ, रुमाल आदींचा वापर करावा. डोळ्यांवर गॉगल लावावा.
उष्णतेमुळे डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डोळे कोरडे पडण्याच्या तक्रारी वाढतात. विशेषतः खेळाडू, मुले आणि वाहनचालकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. डोळ्यांत जळजळ, खाज, लालसरपणा, धूसर दिसणे अशा तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई, ल्यूटिन, झिएक्सॅन्थिन आणि ओमेगा-3युक्त आहार डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतो. गाजर, लिंबू-पुदिना पाणी यांसारखे पदार्थ उपयोगी ठरतात.
डॉ. योगेश चौगुले, नेत्ररोगतज्ज्ञ
उष्णतेमुळे शरीरातील रक्तप्रवाह त्वचेकडे वळतो. त्यामुळे आतड्यांवरील रक्तपुरवठा कमी होऊन पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे पोट फुगणे, जडपणा, भूक कमी लागणे, बद्धकोष्ठता आणि आयबीएसच्या तक्रारी वाढू शकतात. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने साल्मोनेला, ई-कोलाईसारख्या जिवाणूंमुळे फूड पॉयझनिंग आणि पोटाचे संसर्ग वाढतात.
डॉ. प्रमोद कटारे, पचनसंस्था विकारतज्ज्ञ
उन्हाळ्यात निर्जलीकरणामुळे किडनीवर ताण येणे, लघवी कमी होणे, मूत्रमार्ग संसर्ग, किडनी स्टोन आणि जुन्या किडनी विकारांचे तीव होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. वृद्ध, मधुमेही, मैदानी कामगार आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये धोका आहे.
डॉ. अविनाश इग्नेशियस, मूत्रपिंडरोगतज्ज्ञ