School Student Attendance Verification Pudhari
पुणे

Maharashtra School Attendance: राज्यातील ६३९ शाळांमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित नाही! पटपडताळणीत धक्कादायक वास्तव उघड

२५ ते ५० टक्के अनुपस्थिती असलेल्या २,९४० शाळा; ५० ते ९९ टक्के अनुपस्थितीच्या १,२९८ शाळा; शिक्षण विभागाकडून फेरपटपडताळणीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गांची पटपडताळणी करण्यात आली. या पटपडताळणीमध्ये काही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये २५ ते ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या २,९४० शाळा; ५० ते ९९ टक्के अनुपस्थितीच्या १,२९८, तर १०० टक्के अनुपस्थितीच्या ६३९ शाळा आढळल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शा‍ळांची पटपडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आणि प्रत्यक्ष विद्यार्थिसंख्येबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा पटपडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मागील पटपडताळणीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आलेल्या शाळांची फेरतपासणी करण्यात येणार आहे.

तसेच, ज्या शाळांची एप्रिलमध्ये पटपडताळणी झालेली नाही अशा शाळांचीही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांमधील प्रत्यक्ष विद्यार्थिसंख्या आणि शासकीय नोंदीतील विद्यार्थिसंख्या, यातील तफावत स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील शाळांमधील विद्यार्थिसंख्येच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थितीची खातरजमा करण्यासाठी शिक्षण विभागाने फेरपटपडताळणीचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या शाळांचे वास्तव समोर येण्याबरोबरच विद्यार्थिसंख्येतील संभाव्य तफावत आणि अनियमिततांवरही प्रकाश पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता अकरावीच्या वर्गांची पटपडताळणी करण्याचा उपक्रम यापूर्वी राबविण्यात आला होता. ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय पटपडताळणी करण्यात आली होती. या पटपडताळणीच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर शाळांमधील अनुपस्थितीचे गंभीर चित्र समोर आले. त्यामुळे शाळांमधील प्रत्यक्ष उपस्थिती, नोंदवलेली विद्यार्थिसंख्या आणि शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकता, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT