पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) अंतर्गत सत्तासंघर्षाने शनिवारी नाट्यमय वळण घेतले. अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचा दावा करीत सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी मंडळातील सदस्यांच्या गटाने तिन्ही पदाधिकारी पदमुक्त झाल्याचे जाहीर केले. तसेच, सुनील महाजन यांची अध्यक्षपदी, राजन लाखे यांची प्रमुख कार्यवाहपदी आणि उन्मेष गायधनी यांची कोषाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. मात्र, प्रचंड गोंधळ झाल्याने बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचा दावा अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे परिषदेचे अधिकृत नेतृत्व कोणाकडे, यावरून दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. अविश्वास ठरावाची वैधता, मसापच्या घटनेतील तरतुदी आणि बैठकीच्या प्रक्रियेवरून सुरू झालेला हा वाद आता धर्मादाय आयुक्त कार्यालयापर्यंत आणि पुढे न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून मसापमधील वाद चर्चेत आहेत. शनिवारी या वादाने कळस गाठला. अविश्वास ठरावावरून मसापमध्ये मोठा गोंधळ झाला. शंभराव्या साहित्य संमेलनाला अवघे दोन महिने उरले असताना ‘मसाप’मध्ये सत्ताबदलाची ‘नांदी’ देणारे नाट्य घडले. सकाळी ११ वाजता कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. आजची बैठक घटनेतील तरतुदींनुसार घेण्यात आली. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुरुषोत्तम काळे यांची नेमणूक केली. आपल्याकडे बहुमत नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला. सभेत कोणताही गोंधळ झाला नाही. त्यांनीच सभा सोडली असून, कार्यकारी मंडळाचा ताबा आमच्याकडेच असल्याचे सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर, गोंधळामुळे बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याने अविश्वास ठरावाचा मुद्दा बैठकीमध्ये चर्चेच्या पटलावर आलाच नाही,’ असे योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अविश्वास ठराव मांडणाऱ्या गटाकडून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सुनील महाजन, प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे आणि कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी यांची निवड झाली, असे महाजन गटाकडून बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून काम केलेल्या पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले.
नांदी संमेलने स्थगित; उर्वरित निधी दुष्काळग्रस्तांना देणार
शंभराव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ९९ नांदी संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उर्वरित नांदी संमेलने स्थगित करून, झालेला खर्च वजा करून उर्वरित निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन गटाने पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचे लेखापरीक्षण करून खर्चाचा तपशील राज्य सरकारला सादर करण्यात येईल, असेही या गटाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे उर्वरित संमेलने नियोजनानुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, अशी भूमिका सोमण यांनी मांडली. त्यामुळे नांदी संमेलनांच्या आयोजनाबाबतही दोन्ही गटांची भूमिका वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही गटांची धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याची तयारी
अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा महाजन गटाचा दावा, तर ठरावच नियमानुसार मांडण्यात न आल्याने संपूर्ण प्रक्रिया बेकायदा असल्याची सोमण यांची भूमिका यामुळे मसापमधील नेतृत्वाचा पेच कायम आहे. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून मार्गदर्शन घेणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, ठरावाच्या वैधतेबाबत आवश्यकतेनुसार धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे महाजन गटाने म्हटले आहे. त्यामुळे मसापचा अधिकृत ताबा कोणाकडे राहणार, याबाबतचा निर्णय आता पुढील प्रशासकीय आणि संभाव्य न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे. साहित्य क्षेत्राचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
इतिवृत्तासाठी उपोषण; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लेखी आश्वासन
कार्यकारिणीच्या बैठकीचे इतिवृत्त आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती मिळाव्यात, या मागणीसाठी महाजन गटातील सदस्यांनी परिषदेत उपोषण सुरू केले. गेल्या दीड महिन्यांपासून चार लेखी पत्रांद्वारे मागणी करूनही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. यावर पोलिसांनी मध्यस्थी केली. महाळंक यांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीच्या इतिवृत्ताच्या प्रती देण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मसापच्या इतिहासात प्रथमच अविश्वास ठराव मंजूर
साहित्य परिषदेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात प्रथमच संस्थेच्या अध्यक्षांसह प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्षांविरोधात कार्यकारी मंडळातील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. एवढेच नव्हे, तर तो मंजूर झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. संस्थेच्या इतिहासात अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचा दावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
साहित्य महामंडळातही सत्ताबदल होणार?
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठरावाच्या घडामोडींनंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातील सत्तासमीकरणांबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मसापचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे तिघेही साहित्य महामंडळाचेही प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे मसापमधील सत्तांतराच्या दाव्याचे पडसाद महामंडळातही उमटणार का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महामंडळाचे कामकाज नेहमीप्रमाणेच सुरू राहील आणि साहित्य संमेलनांचे आयोजनही नियोजित पद्धतीने सुरू राहील, असे स्पष्टीकरण सोमण यांनी दिले आहे. तर, येत्या काही दिवसांत महामंडळाच्या संदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
सर्वांचे स्वागताध्यक्ष फडवणीसच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागताध्यक्षपदी निवड सोमण गटाने आधीच निश्चित केली होती. तर महाजन गटानेही फडणवीस यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. समर्थ युवा फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त राजेश पांडे हेच शंभराव्या साहित्य संमेलनाचे संयोजक राहतील, असे महाजन यांनी स्पष्ट केले. सत्तासंघर्षाचा परिणाम संमेलनाच्या तयारीवर होऊ नये, अशी अपेक्षा दोन्ही गटांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मसापमधील अंतर्गत वादाचा संमेलनाच्या आयोजनावर कोणताही परिणाम होमार नाही. साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे. समर्थ युवा फाउंडेशनकडून संमेलनाच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे, असे राजेश पांडे यांनी सांगितले.
मसाप परिसरात पोलिस बंदोबस्त
कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मसाप परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठकीनंतर दोन्ही गटांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या. महाजन गटाने परिषदेच्या आवारात, तर सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी माधवराव पटवर्धन सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका मांडली. दिवसभरातील या घडामोडींमुळे मसाप परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.
आजचे ‘चौकटीबाहेरचे स्त्रीलेखन’ हे नांदी संमेलन होणार
महाजन गटाने नांदी संमेलने स्थगित केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २९) ‘चौकटीबाहेरचे स्त्रीलेखन’ या विषयावर नांदी संमेलन होणार आहे. हे संमेलन नांदी संमेलन म्हणूनच होणार असून, स्वाती महाळंक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तर वाद असले तरी योगेश सोमण आणि सुनील महाजन संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा - संमेलनाच्या स्वागताध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी सांगितले.
अविश्वास ठरावावरून दबावाचे राजकारण : सुनील महाजन
‘गेल्या सात महिन्यांत तिन्ही पदाधिकाऱ्यांनी मनमानी आणि एकतर्फी कारभार चालवला असून, शासनाच्या दोन कोटी रपयांच्या निधीची आर्थिक मान्यताही घेतलेली नाही’, असा आरोप सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. बैठकांचे इतिवृत्त आणि कार्यपत्रिका वेळेत न देणे, तसेच जिल्हा प्रतिनिधींना विश्वासात न घेणे याला कंटाळून २१ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. ठराव प्रलंबित असताना पदाधिकाऱ्यांना सभा घेण्याचा अधिकार नसल्याने कार्यकारिणीने पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली. सभागृहात आपल्याकडे बहुमत नसल्याचे लक्षात येताच तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आरडाओरडा करून सभात्याग केला. आम्ही कोणीही सभात्याग केला नसून, पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास अधिकृत बैठक शांततेत पार पडली आहे. या संपूर्ण घडामोडींचे व्हिडिओ चित्रीकरण आपल्याकडे असून, १३ डिसेंबरच्या बैठकीत पुढील कायदेशीर दिशा ठरवू, असे महाजन यांनी सांगितले. ठरावावरून गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला असून, आमच्यावर दबावही टाकण्यात आल्याचे महाजन म्हणाले. तसेच, राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही त्यांनी फेटाळला.
ठराव सभेच्या पटलावरच आला नाही; मंजुरीचा दावा चुकीचा : योगेश सोमण
सोमण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची बैठक सुरू झाली. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर प्रमुख कार्यवाह महाळंक यांनी श्रद्धांजलीसाठी सर्वांना उभे राहण्याची सूचना केली. मात्र, त्याच क्षणी महाजन यांनी ‘आमच्या अविश्वास ठरावाला उत्तर द्या’ अशी मागणी केली. अध्यक्षांनी किमान श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू होऊ द्यावे, अशी विनंती केली, तरीही घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच ठेवला. महाळंक यांनी संपूर्ण इतिवृत्ताचे वाचन केले, तर निफाडकर यांनी हात जोडून समोपचाराने प्रश्न सोडवण्याची विनंती केली. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अशा गोंधळात आणि घटनाबाह्य पद्धतीने कामकाज रेटता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत सभा तहकूब केल्याचे सोमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मसापच्या १६ हजार आजीव सदस्यांमधून आम्ही निवडून आलो आहोत. दोन कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा पै न पै हिशेब कागदपत्रांसह सादर केला जाईल. निधीत एक रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे कामकाज आणि शंभरावे साहित्य संमेलन थांबता कामा नये. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडून मार्गदर्शन घेऊ आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असेही सोमण यांनी सांगितले.
असे घडले नाट्य...
शनिवारी मसापच्या कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात
अविश्वास ठरावावरून बैठकीत वाद आणि गोंधळ
महाजन गटाकडून खुलासा व चर्चेची मागणी
पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केल्याचा महाजन गटाचा दावा
गोंधळामुळे बैठक तहकूब केल्याचे सोमण यांचे स्पष्टीकरण
तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या सभात्यागानंतर बैठक सुरू ठेवल्याचा महाजन गटाचा दावा
अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे महाजन गटाकडून जाहीर.
सोमण, महाळंक आणि निफाडकर पदमुक्त झाल्याचा दावा
सुनील महाजन अध्यक्षपदी, राजन लाखे प्रमुख कार्यवाहपदी, तर उन्मेष गायधनी कोषाध्यक्षपदी
दोन्ही गटांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा, आरोप-प्रत्यारोप
इतिवृत्ताच्या प्रतींसाठी महाजन गटाचे उपोषण
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३ डिसेंबरला प्रती देण्याचे लेखी आश्वासन, उपोषण मागे
ठरावाच्या वैधतेसाठी धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याची दोन्ही गटांची तयारी, न्यायालयीन लढाईचे संकेत