Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad Dispute: शंभराव्या साहित्य संमेलनाआधीच मसापमध्ये अंतर्गत वाद; सुनील महाजन यांना कारवाईची नोटीस

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रक्रियेवरून संघर्ष; प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांचे पत्र, महाजन कायदेशीर सल्ला घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग येण्याची अपेक्षा असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत (मसाप) मात्र अंतर्गत वादाने डोके वर काढले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रक्रियेवरून सुरू झालेला संघर्ष थेट आरोप- प्रत्यारोप आणि कारवाईच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचला होता. पण, आता हा वाद कोर्टापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. सभेच्या आयोजनातील त्रुटींवर आक्षेप घेणारे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांना प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी 'तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा करणारे पत्र रात्री पाठविले. त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मसापमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहे.

वार्षिक सभेच्या प्रक्रियेवरून सुरु झालेला वाद चिघळला

मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्यानंतर संस्थेतील वाद सुरू झाला. येत्या १४ ऑक्टोबरला नियोजित असलेल्या सभेच्या आयोजनातील प्रक्रियात्मक त्रुटींकडे महाजन यांनी लक्ष वेधले होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील पूर्वचर्चा आणि आवश्यक मान्यता याबाबत स्पष्टता नसणे, सभेच्या सूचनेवरील तारखा आणि जावक क्रमांकांमध्ये विसंगती असणे, तसेच लेखापरीक्षण अहवाल आधी कार्यकारिणीसमोर मांडून त्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याची गरज, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर सभा पुढे ढकलण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाळंक यांनी महाजन यांना सोमवारी (दि.१२) पत्र पाठवून त्यांच्या आक्षेपांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

संस्थेचे वातावरण बिघडवून अंतःस्थ हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होत असल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा महाळंक यांनी पत्रातून केली. अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांवर विधाने करून संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचविल्यास सक्षम प्राधिकरणांकडे दाद मागण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे. ८ ऑक्टोबरला अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांची बैठक झाली होती. सभेच्या आयोजनातील तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महाळंक यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय घेताना महाजन यांना स्वतंत्रपणे कळविणे किंवा त्यांना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला बोलावणे बंधनकारक नव्हते. पत्रांवरील तारखा आणि जावक क्रमांकांमधील चुका या केवळ टंकलेखनातील असल्याचा दावा महाळंक यांनी केला. या चुका सार्वजनिकपणे मांडण्यामागील महाजन यांच्या हेतूवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिषदेच्या कामकाजातील त्रुटी मांडण्याच्या पद्धतीवरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक कारवाईच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचल्याने संस्थेतील मतभेद अधिकच उघड झाले आहेत. दरम्यान, महाजन यांनी या पत्राला उत्तर देताना कायदेशीर सल्ला घेऊन पुढील भूमिका ठरविणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या कामकाजातील त्रुटी निदर्शनास आणून देणे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मसापमधील हा वाद आता कोणते वळण घेतो, याकडे साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कायदेशीर सल्ला घेणार: सुनील महाजन

संस्थेच्या कामकाजातील त्रुटी निदर्शनास आणून देणे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून आपले कर्तव्य आहे. सोमवारी रात्री प्रमुख कार्यवाहांनी मला व्हॉट्सॲपद्वारे पत्र पाठविले. व्हॉट्सॲपद्वारे पत्र पाठविणे अधिकृत नाही. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील भूमिका ठरवेन,' असे महाजन यांनी सांगितले. लोकशाही व्यवस्थेत साध्या कागदावरही एखादी व्यक्ती पत्र पाठवू शकते. मग, संवाद पुणेच्या लेटरहेडवर पत्र का दिले, असा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. मला मसापचे अधिकृत लेटरहेड मिळालेले नाही. ते मिळाले असते, तर त्यावरून पदाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असते,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT