पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि. 27) मोठा गोंधळ झाला. कारण, हाती फलक घेऊन निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्या आजीव सभासदाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार सभेत घडला. ‘सत्य जरी एकला-असत्याला पुरून उरला’ तसेच ‘मसापचे पवित्र मंदिर, नाही कुणाची खासगी जागीर’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन निषेध करणाऱ्या सभासदाला धक्के देत सभागृहाबाहेर काढण्यात आले आणि सभागृहाचा दरवाजा लावून घेण्यात आला.(Latest Pune News)
दरम्यान, साहित्य संस्थेच्या आवारात बौद्धिक मुद्द्यांद्वारे लढत होण्याऐवजी महापालिका किंवा जिल्हा परिषदेसारख्या राजकीय सभेसारखीच धक्काबुक्की करण्यात आल्याचे खेदजनक दृश्य दिसल्याची भावना साहित्यवर्तुळात होत राहिली. ‘मसाप’ची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या डॉ. रावसाहेब कसबे यांच्याऐवजी उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या कामांमध्ये कार्यवृत्त, ताळेबंद, उत्पन्न-खर्चपत्रक, 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संमत करण्यासह पंचवार्षिक निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सभेस उपस्थित होते. सभेत हा धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.
लोकशाही माध्यमातून निषेध नोंदविण्याचा अधिकार मला आहे. मात्र, ‘मसाप’च्या बेकायदेशीर गटाने तो अधिकार हिरावून घेतला आहे. या अनधिकृत गटाकडून मला ही अपेक्षा होतीच. कारण, जे लोक असंविधानिक पद्धतीने या संस्थेचा ताबा घेऊन जबरदस्तीने कारभार चालवत आहेत. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा माझी नव्हती.राजकुमार धुरगुडे, आजीव सभासद, ‘मसाप’
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनधिकृत कार्यकारिणीने घेतलेल्या अनधिकृत वार्षिक सभेत केलेली निवडणुकीची घोषणा ही घटनाविरोधी कृती आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली आहे.धनंजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती
सभा सुरू असताना धुरगुडे आणि काही जण हातात फलक घेऊन धुरगुडे हे डॉ. कदम यांचे मनोगत सुरू असताना सभागृहात आले. मात्र, काही सभासदांनी त्यांच्या कृतीला आक्षेप घेऊन सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.
त्यातच एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून येत हस्तक्षेप केल्यानंतर काही जणांनी धुरगुडे यांच्या अंगावर जात त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले. तेव्हा एकच गोंधळ उडाला.
परिषदेचे आजीव सभासद असलेले धुरगुडे एकटे आले असते तर त्यांना सभागृहात घेतले असते. मात्र, त्यांच्यासमवेत आलेले परिषदेचे सभासद नसल्याने त्यांना बाहेर काढावे लागले, असे स्पष्टीकरण परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांना दोनदा द्यावे लागले. गोंधळामुळे सभा काही काळासाठी थांबली पण, नंतर सभा पार पडली.
पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असताना त्यांना अशी सभा घेण्यापासून रोखण्याची मागणी राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. मात्र, तरीही सभा सुरू असल्याचे समजताच निषेध नोंदविण्यासाठी आलेल्या धुरगुडे यांना काही सदस्यांनी धक्काबुक्की केली.
आमच्या कार्यकारिणी मंडळापुढे ‘मुदतवाढ, मुदतवाढ’ हा शब्द वापरला जातो. त्या वेळेसची पत्रिका काढून बघा, त्यामध्ये 2021 ते 2026 या कालावधीसाठी कार्यकारिणी मंडळाची निवड करणे असाच विषय घेतलेला आहे. त्यामुळे मुदतवाढ असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. कोरोना काळात माझ्या जागी कोणीही कार्याध्यक्ष असते, तर त्यांनी हाच निर्णय घेतला असता. त्या वेळी वार्षिक सर्वसाधारण सभेतील सभासदांनी आमच्या कार्यकारिणी मंडळाला निवडून दिले. ज्या बदलांसाठी गेली 50 वर्षे चर्चा फक्त सुरू होती, ते बदल आम्ही केले. हे बदल अगदी टीकाकारांनाही नाकारता येणार नाहीत. महाराष्ट्र साहित्य परिषद हुकूमशाही पद्धतीने चालणार नाही. निवडणूक घेण्याची मागणी करणारे आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेवर प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी करू लागले आहेत. अशा साहित्यबाह्य शक्तींंना मसाप गिळंकृत करायची आहे. मात्र, हा डाव उधळून लावला पाहिजे. साहित्यिकांनी अशा वेळी गप्प न राहता भूमिका घेतली पाहिजे; अन्यथा त्यांना येणारा काळ माफ करणार नाही.प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप