

शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खा.शरद पवार आहेत. कारखान्याचा अध्यक्ष त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतो. त्यामुळे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बाबत बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. अनेक बाबींची कमतरता, कामकाजातील चुका यामुळे शिवनगर विद्या प्रसारक मंडळावर काही कोटींचा बोजा आहे. त्यामुळे मंडळाच्या कामकाजात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अजित पवार यांनी केले. (Latest Pune News)
माळेगाव कारखान्याच्या 70 व्या वार्षकि सर्वसाधारण सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची आर्थकि परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सन 2023-24 मध्ये 4 कोटी 20 लाख रुपयांचा तोटा आहे. महाराष्ट्र बँकेचे 5 कोटीचे कॅश क्रेडिट आहे. असा एकूण 9 कोटींचा बोजा शिक्षण संस्थेवर आहे. दुसरीकडे टाऊन प्लॅनिंगची मंजुरी न घेता काही इमारती उभ्या केल्यामुळे 2 कोटी 86 लाखाची दंडाची नोटीस आली आहे. त्यासाठी आर्थकि शिस्त लावणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्याचा अभाव, जबाबदारीचे भान नाही. यात सुधारणा करण्याची गरज आहे.
डिप्लोमा कॉलेजबाबत एआयसीटी कडे तक्रारी गेल्याने 600 प्रवेश क्षमतेवरून 285 वर प्रवेश क्षमता घसरली. त्यामुळे जास्तीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आर्थकि बोजा संस्थेवर पडत आहे. दुसरीकडे 19 शिक्षक व 36 शिक्षकेतर अधिकचे भरल्याने त्यांच्या पगाराचा बोजादेखील सहन करावा लागत आहे. संस्थेच्या हिशोबात अचूकता आणणे गरजेचे आहे. ज्या लोकांनी चुका केल्या आहेत त्यांच्यावर एफआयआर नोंद झाला आहे. प्राध्यापक, कर्मचारी यांच्या तक्रारी आणि कोर्ट केसेस यामध्ये वाढ झाली असून, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
कमकुवत सुरक्षा व्यवस्था, होस्टेलच्या मेसबाबत असलेल्या तक्रारी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना गुणवत्ता वाढ प्रशिक्षण, संशोधनासाठी मदत, तक्रार निवारण समिती, फी वसुली, अतिरिक्त खर्च टाळणे, सीएसआर फंडातून तसेच माजी विद्यार्थी निधीतून शिक्षण संस्थेला मदत करणे, आर्थकि व्यवहाराचे डिजिटलायझेशन, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी, परिसरात सीसीटीव्ही बसवणे आदीबाबत निर्णय घेण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
‘माळेगाव’च्या वार्षिक सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार.