सुवर्णा चव्हाण
पुणे : कोरोनाकाळानंतर महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला... नियमित देणग्या कमी झाल्याने प्रकल्प अर्धवट राहिले. पण, या संकटाच्या काळात संस्थांना मदतीचा हात मिळाला तो विविध कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सामाजिक दायित्व निधीचा (सीएसआर निधी). महाराष्ट्रातील सुमारे 2 हजारांहून अधिक संस्थांना सध्या सीएसआर निधी मिळत आहे. या संस्थांना अंदाजे 3 हजार कोटी रुपयांचा निधी मिळत असून, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य यांसह विविध प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या संस्थांना नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत संस्थांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. विशेषत: संस्थांद्वारे ग््राामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली आहे.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक संस्था या अनेकांसाठी आधारवड आहे. राज्यात आणि पुण्यातही दिवसेंदिवस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची संख्या वाढत असल्याचे शुक्रवारी (दि. 27) साजरा होणाऱ्या जागतिक स्वयंसेवी संस्था दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या आढाव्यात दिसून आले.
मुंबई, पुणे, कोल्हापूर असो वा सातारा अशा विविध जिल्ह्यांमध्ये संस्थांची संख्या आणखी वाढली आहे. 2023 च्या एका आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या यादीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्वी संस्थांना देणग्यांवरच सामाजिक उपक्रम राबवावे लागायचे. पण, आता काळाप्रमाणे चित्र बदलले आहे. आता संस्थांना आधार आहे तो आयटी क्षेत्रातील कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीचा. या निधीमुळे अनेक संस्थांना आर्थिक बळ मिळाले.
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा म्हणाले, ज्या कंपन्यांची उलाढाल 500 कोटींपेक्षा अधिक आहे, त्या कंपन्यांना सरासरी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सीएसआर निधी म्हणून खर्च करावा लागतो. या निधीतून स्वयंसेवी संस्थांच्या प्रकल्पांना पाठिंबा दिला जातो. वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर म्हणाल्या, सीएसआर निधीमुळे आमच्यासह अनेक संस्थांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. अनेक प्रकल्पांना निधीचा आधार आहे. पण, निधी देताना संस्थांना कोणत्या प्रकल्पांसाठी निधीची गरज आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
सीएसआर निधी हा स्वयंसेवी संस्थांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला एका प्रकल्पासाठी एका फाउंडेनकडून निधी मिळत आहे. त्यामुळे आम्ही देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. या निधीमुळे अनेक स्वयंसेवी संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम बनल्या आहेत.तेजस्वी सेवेकरी, सहेली सेवा संघ
सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कंपन्यांकडून जो निधी सामाजिक संस्थांना दिला जातो त्या निधीला सीएसआर निधी असे म्हटले जाते. भारतात कार्यरत काही कंपन्यांना एक ठरावीक निधी द्यावा लागतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून विशेष असे नियम आणि काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. कंपनीला उपक्रमासाठी सीएसआर निधी देणे अनिवार्य आहे. विविध आयटी कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि खासगी कंपन्यांकडून सीएसआर निधी दिला जातो. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांसाठी संस्थांना निधी देण्यात येतो. काही वेळा निधी हा एकदाच दिला जातो किंवा दीर्घकालीन प्रकल्पांसाठी वार्षिक निधी दिला जातो.