Final Election Voter List Pudhari
पुणे

Election Voter List: नगरपरिषद, नगरपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या जाहीर; तब्बल ६० हजार हरकतींचा निपटारा

फुरसुंगी-उरुळी देवाचीमध्ये सर्वाधिक १८ हजार हरकती; ७ नोव्हेंबरला मतदान केंद्रांची यादी होणार जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. सुमारे ६० हजार हरकती आणि सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या वतीने पथके तयार करून स्थळपाहणी करण्यात आली. पाहणीनंतर संबंधित शंकांचे निरसन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. (Latest Pune News)

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल ५९ हजार ९७८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे प्रभागबदलाशी संबंधित हरकती आहेत. या हरकतींबाबत प्रत्यक्ष मतदारांच्या घराला भेट देऊन निर्णय घेण्यात आला आहे. एकूण हरकतींपैकी १८ हजार २३४ हरकती फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या हद्दीतील आहेत.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती नोंदविण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली. या हरकतींपैकी सुमारे ८० टक्के हरकती नागरिकांनी वैयक्तिकरीत्या नोंदविल्या होत्या. त्यात पत्ता एका ठिकाणी असताना नाव दुसऱ्या प्रभागात नोंदले असल्याबाबत तक्रारी होत्या. यासाठी प्रशासनाने संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन पडताळणी केली.

ज्या मतदारांना आपले म्हणणे मांडायचे होते, त्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली आणि त्यानुसार अंतिम निर्णय तयार करण्यात आला. आक्षेप व हरकतींचा निपटारा पूर्ण झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून जाहीर केल्या. अंतिम मतदार याद्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या संकेतस्थळांवर आणि कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मतदान केंद्रांची यादी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल, असेही दुर्वास यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT