Kusti Pudhari
पुणे

Maharashtra Kesari Kusti 2026: महाराष्ट्र केसरी कुस्ती 2026 पुण्यात; वाघोलीच्या मातीत शड्डूचा गजर

राज्यातील सर्वांत प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेचे आयोजन मार्चमध्ये; दोन महाराष्ट्र केसरींच्या चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: कुस्तीगिरांच्या गळ्यातील ताईत आणि महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठित समजली जाणारी ‌‘महाराष्ट्र केसरी‌’ कुस्ती स्पर्धा यंदा पुण्याच्या पावन भूमीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याकडे लागले आहे. दरम्यान, कुस्तीतील दुसऱ्या गटाने ही महाराष्ट्र केसरी भरविण्याबाबत तयारी केली असून, यावर्षीही दोन महाराष्ट्र केसरी राज्याला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भरविल्या जातात. परंतु, यावर्षी महापालिकांच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून आणि महापालिका क्षेत्रातून मिळून सुमारे 45 हून अधिक संघांतील मल्ल सहभागी होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्पर्धेच्या परंपरेनुसार माती आणि आधुनिक मॅट, अशा दोन्ही प्रकारचे आखाडे असणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविणाऱ्या पैलवानाला चांदीची गदा आणि मानचिन्ह देऊन गौरविले जाते. पुण्यातील बालेवाडीनंतर आता वाघोलीच्या मातीत शड्डूचा आवाज घुमणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल या ठिकाणी आपली ताकद आजमाविण्यासाठी येणार आहेत.

वाघोलीत जय्यत तयारी

वाघोलीतील स्थानिक आयोजक आणि कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी यांनी मैदानाची पाहणी सुरू केली आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या पैलवानांची निवासव्यवस्था, भोजन आणि सरावासाठीच्या सोयी, यावर विशेष भर दिला जात आहे. वाघोलीच्या इतिहासातील ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा निर्णय झालेला नव्हता. वास्तविक, न्यायालयात कुस्तीबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याने आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यावर ठाम असून, महिनाभरात तारीख जाहीर करू.
विजय बराटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी धाराशिवऐवजी पुण्यातच घेण्याचा मानस आहे. त्यासाठी वाघोली येथे स्पर्धेची तयारी सुरू असून, मार्च महिन्यात 18 ते 22 मार्च या कालावधीत स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. याबाबत आगामी दोन ते तीन दिवसांत अधिकृत घोषणा आम्ही करू. त्याचबरोबर सासवड येथे जाहीर झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. अलिकडच्या काळात कोणीही महाराष्ट्र केसरीचे नाव देऊन स्पर्धा जाहीर करीत आहेत.
संदीप भोंडवे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT