Maharashtra Rain Update Pudhari
पुणे

Maharashtra Rainfall Report: अल निनोची स्थिती असतानाही जुलैत भरपूर पाऊस? या कारणांनी बरसला धो-धो

अल निनोवर मात करणाऱ्या २४ कमी दाबाच्या प्रणालींचा परिणाम; कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची तूट, ‘पुढारी रिसर्च रिपोर्ट’मधून कारणांचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक पाऊस झाला. यात मध्य महाराष्ट्राला झुकते माप मिळाले. तेथे ७२ टक्के जास्त पाऊस झाला, तर इतर भागात मात्र असमान वितरणामुळे कमी पाऊस झाला. अल निनोची स्थिती असतानाही २४ कमी दाबाचे पट्टे, ऑफ शोअर ट्रफ, शिअर झोन या प्रणालींनी त्यावर मात करत राज्यात भरपूर पाऊस दिला. राज्यात कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस का? या बाबींवरील हा पुढारी रिसर्च रिपोर्ट...

यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण जुलै महिन्यात महाराष्ट्रात एकूण ४५४.२ मि.मी. पाऊस झाला, जो सामान्य सरासरीपेक्षा (३२४.२ मि.मी.) तब्बल ४० टक्के जास्त आहे. यात मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक ७२ टक्के, कोकण ३३ टक्के, तर विदर्भ २१ टक्के, मराठवाडा १७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

या कारणांनी बरसला धो-धो पाऊस

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे:

जुलैमध्ये तब्बल २४ कमी दाबाचे पट्टे तयार झाले. यात प्रामुख्याने जुलैच्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात लागोपाठ चार कमी दाबाच्या प्रणालींनी जादू केली. यातील एक तीव्र कमी दाबाचा पट्टा ओडिशा व छत्तीसगडमार्गे पूर्व विदर्भाच्या वर (ब्रह्मपुरी आणि नागपूरजवळ) स्थिर झाला. यामुळे विदर्भात जुलैच्या शेवटच्या दिवसांत धो-धो पाऊस पडला.

  • शिअर झोन : दोन विरुद्ध वाऱ्यांचा संगम

जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात उत्तर अक्षांशावर मध्य भारताच्या वातावरणात ‘शिअर झोन’ (दोन वेगवेगळ्या दिशांच्या वाऱ्यांचा संगम) तयार झाला होता. यामुळे ढगांची घनता वाढून मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पावसाची स्थिती होती.

  • ऑफ-शोअर ट्रफ : किनारट्टीवरचे कमी दाब पट्टे

जुलैच्या प्रारंभी महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रात तीव्र ‘ऑफ-शोअर ट्रफ’ सतत सक्रिय होता. यामुळे समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढून कोकण, मुंबई परिसरात अतिवृष्टी झाली.

अतिमुसळधार (पाऊस मि.मी.)

  • नाशिक : १६९ टक्के (सरासरीः २९४, पडला : ७९०)

  • पुणे : १२९ टक्के (सरासरी : ३१०, पडलाः ७१०)

  • पालघर : १२४ टक्के (सरासरी : ६७९, पडला : १०६६)

  • मुंबई उपनगर : ७४ टक्के (सरासरी : ८५५, पडला : १४९१)

  • मुंबई शहर : ६० टक्के (सरासरी : ७३४, पडला : ११७६)

मुसळधार (५०% पेक्षा जास्त)

  • रायगड : ५७ % (सरासरी : ११७५, पडला : १८४३)

  • ठाणेः ५३% (सरासरी : ९४५,पडलाः १४५१)

  • धुळे : ५३% (सरासरीः२५८,पडलाः ५३१)

  • गोंदियाः ५६% (सरासरीः ४२८,पडलाः६६३)

  • बुलडाणा : ५१% (सरासरीः २२४,पडलाः३३८)

  • यवतमाळ : ५१% (सरासरीः २५९,पडलाः३९१)

अल निनो स्थिती असतानाही जुलैमध्ये यंदा महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांतील बहुतांश भागात अतिमुसळधार पाऊस झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र. जुलैमध्ये एकुण २४ कमी दाबाचे पट्टे तयार झाले. या पट्ट्यांनी काही भागात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस दिला. जुलैमध्ये एकूणच पावसाचे असमान वितरण झाले.
डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, आयएमडी, दिल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT