Police  Pudhari
पुणे

Maharashtra IPS SP Post Competition: एसपी पदासाठी स्पर्धा थांबवा; डीजीपी सदानंद दाते यांची आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावणी

वारंवार बदली, राजकीय हस्तक्षेपावर नाराजी; ‘सिंघम कल्चर’वरही वरिष्ठांची खरडपट्टी

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे

पुणे: राज्य पोलिस दलात जिल्हा पोलिसप्रमुख (एसपी) पदासाठी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेवर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी तीव नाराजी व्यक्त केली. “एक जिल्हा मिळाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, हे योग्य नाही. राज्यात जिल्हे किती आहेत, याचाही विचार करा. इतर अधिकाऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

मुंबईत 27 एप्रिल रोजी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्य पोलिस दलातील सर्व घटकप्रमुख उपस्थित होते. दाते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही मोजके अधिकारी वारंवार एसपी पद मिळवत असतील, तर इतरांना संधी कधी मिळणार, याचा विचार होणे गरजेचे आहे. “कामात कसूर केली तर त्याचा परिणाम तुमच्या एसीआरवर (वार्षिक गोपनीय अहवाल) होईल,” असा इशाराही त्यांनी दिला. मी येथे येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडून चांगल्या अपेक्षा केल्या होत्या. त्यामुळे तुम्ही देखील चांगले काम करा, तरच त्या पूर्ण होतील.

दोषसिद्धीचे प्रमाण अपेक्षित वेगाने वाढताना दिसत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. गुन्हे सिद्ध होण्यासाठी तपास, पुरावे आणि न्यायप्रक्रिया अधिक मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. “बेसिक पोलिसिंग मजबूत करा, गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी घटकप्रमुखांनी सक्रिय भूमिका घ्यावी,” असे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न प्रभावीपणे हाताळणे आणि पोलिसांना काळानुरूप प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पोलिसांच्या कल्याणासाठी अधिक काम करण्याचे निर्देशही दाते यांनी दिले. दरम्यान, राजकीय वजन वापरून इच्छित जिल्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही दाते यांनी अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा पोलिसवर्तुळात रंगली आहे.

‌‘प्रत्यक्ष पोलिसिंगवर लक्ष केंद्रित करा‌’

मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनीही या बैठकीत अधिकाऱ्यांची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली. ‌‘तुमचे अधिकारी काय करतात, ते एकदा पाहा. काही अपवाद सोडता बाकी सर्व प्रकारचे व्हिडीओ ते करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. गेल्या काही वर्षांत काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रील्स व व्हिडीओ बनवण्यात अधिक गुंतलेले दिसतात. “सिंघम कल्चर थोडं बाजूला ठेवा आणि प्रत्यक्ष पोलिसिंगवर लक्ष केंद्रित करा,” असा टोलाही त्यांनी लगावला.

बदल्यांमध्ये दाते यांना विचारात न घेतले गेल्याची चर्चा

महाराष्ट्र पोलिस दलातील कडक शिस्तीचे आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी दाते यांची ओळख. त्यामुळे केंद्रातून राज्यात आलेल्या दाते यांच्याकडून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंळे त्यांचा भमनिरास झाला. वास्तविक, या बदल्यांमध्ये दाते यांना विचारात घेतले गेले की नाही, याबाबत आयपीएसवर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT