Cattle Pudhari
पुणे

Maharashtra Indigenous Cattle IVF Program: देशी गोवंश संवर्धनासाठी आयव्हीएफ-भ्रूण प्रत्यारोपण करार; दूध उत्पादन वाढीस चालना

राहुरी कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात सामंजस्य; शेतकऱ्यांना थेट लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या (आयव्हीएफ) संयुक्त अंमलबजावणीसाठी नुकताच परळी वैजनाथ (बीड) येथे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील देशी गोवंश संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस चालना मिळण्यास मदत होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी या वेळी पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. या करार प्रक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे तसेच पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे यांचे मार्गदर्शन लाभले.

कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गोवंश संवर्धन व सुधारणा कार्यक्रमांतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च वंशावळीच्या व जास्त दूध उत्पादन देणाऱ्या देशी गायी निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रावर शंभरपेक्षा अधिक उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या कालवडींचा यशस्वी जन्म झाला असून हा उपक्रम राज्यातील पशुधन विकासासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी कळविली आहे.

या करारानुसार शेतकऱ्यांच्या संकरित गायींमध्ये उच्च प्रतीचे देशी गायींचे भ्रूण प्रत्यारोपित करून यशस्वी गर्भधारणा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्राप्तकर्त्या गायींची निवड, समन्वय, प्रत्यारोपणानंतर गर्भधारणा तपासणी व नोंद व्यवस्थापन ही जबाबदारी कृषी विद्यापीठाकडे राहील, तर उच्च प्रतीचे भ्रूण उपलब्ध करून देणे, ओपीयू-आयव्हीएफ प्रक्रिया व तांत्रिक अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत केली जाणार असल्याचे डॉ. माने यांनी म्हटले आहे.

देशी गायींच्या उच्च वंशावळीच्या कालवडी तयार करणार

पशुसंवर्धन विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ‌‘ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळेद्वारे राज्यभरात देशी गायींच्या उच्च वंशावळीच्या कालवडी तयार केल्या जात आहेत. या सामंजस्य करारांतर्गत सहीवाल, गिर, राठी, रेडसिंधी व थारपारकर तसेच खिल्लार व डांगी या दुधाळ देशी जातींच्या उच्च जनुकीय क्षमतेच्या कालवडी शेतकऱ्यांच्या बांधावरच तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गायींची दूध उत्पादकता वाढविण्यास थेट मदत होणार असून दुग्धव्यवसाय अधिक लाभदायक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT