Technology Pudhari
पुणे

Global Capability Center India: जीसीसीमुळे पुणे होणार जागतिक टेक हब

महाराष्ट्राच्या ‘जीसीसी धोरण 2025’मुळे लाखो नोकऱ्या व मोठ्या गुंतवणुकीची संधी

पुढारी वृत्तसेवा

जीसीसी म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणजे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ( एमएनसी ) दुसऱ्या देशात उघडलेले तंत्रज्ञान, संशोधन, वित्त, डेटा, आयटी किंवा इंजिनिअरिंगचे केंद्र. परदेशी कंपनीचे संशोधन आणि तंत्रज्ञानाचे मुख्यालय किंवा हब सेंटर भारतात, महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरात उघडला जातो. मुख्यमंत्री जीसीसी हा शब्द वारंवार उच्चारत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील जीसीसी सेंटर खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

या कंपन्या सुरू करतात जीसीसी...

सॉफ्टवेर कंपन्या, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिसिस कंपन्या, कंपन्यांचे संशोधन व विकास केंद्र, वित्तीय संस्था, अकाउंटिंगचे काम करणाऱ्या संस्था, ग््रााहकांसाठीची मदत केंद्रे, प्रोडक्ट अभियांत्रिकी क्षेत्र.

महाराष्ट्र सरकारचे याबाबत धोरण काय?

  • महाराष्ट्र सरकारने ‌‘जीसीसी धोरण 2025‌’ सुरू केले आहे. या धोरणाची मुख्य उद्दिष्टे अशी...

  • राज्यात 400 नवीन जीसीसी केंद्रे उघडणे

  • सुमारे 50 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे

  • यातून राज्यात सन 2030 पर्यंत किमान 30 लाख नोकऱ्या निर्माण करणे. एकट्या पुणे शहरात सुमारे 4 लाख रोजगार निर्माण करणे.

  • सरकार कंपन्यांना कर सवलती, जमीन, ऑफिससाठी जागा, पाणी, वीजपुरवठा, एक खिडकी योजना, संशोधन आणि विकास, तसेच पेटंटसाठी अनुदान

  • राज्यात औद्योगिक पार्क आणि जीसीसी पार्क तयार करणे

पुण्यासाठी जीसीसी का महत्त्वाचे?

पुणे आधीच भारतातील मोठे आयटी इजिंनिअरिंग हब आहे. आजघडीला पुण्यात 360 पेक्षा जास्त जीसीसी केंद्रे कार्यरत आहेत. अनेक मोठ्या कंपन्या येथे काम करतात. पुढील काही वर्षांत 500 पेक्षा जास्त जीसीसी होण्याची शक्यता आहे.

पुणे शहर निवडण्याची कारणे काय?

चांगले आयटी टॅलेंट, इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या, मुंबई जवळ असल्याने व्यवसाय सुलभ करता येतो, ऑफिस खर्च बेंगळुरू आणि मुंबईपेक्षा तुलनेने कमी आहे.

पुणे शहरासह महाराष्ट्राला होणारे फायदे

मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, आयटी, डेटा, इंजिनिअरिंग क्षेत्रात लाखो नोकऱ्या, विदेशी गुंतवणूक, हजारो कोटींची गुंतवणूक, नवीन उद्योग आकर्षित होणार, संरक्षण, औषधी, अपारंपरिक ऊर्जा, लॉजिस्टीक या उद्योगांसह राज्य ऑटोमोटिव्ह हब बनू शकते. या द्वितीय श्रेणी ( टायर टू) शहरांचा विकास होईल. पुणे, मुंबई सोबतच नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांतही जीसीसी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महाविद्यालये अन्‌‍ कंपन्या एकत्र येणार

या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होण्यासाठी कंपन्या आणि महाविद्यालये एकत्र येऊन कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविणार आहेत. थोडक्यात, जीसीसी म्हणजे परदेशी कंपन्यांचे भारतातील हायटेक काम करणारे ऑफिस. महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे की पुणे आणि इतर शहरांना जागतिक टेक व संशोधन केंद्र बनवणे आणि लाखो उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण करणे हा आहे.

(संकलन: आशिष देशमुख)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT