आशिष देशमुख
पुणे: यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’चा जबरदस्त प्रभाव दिसला असून जुलैचा अपवाद वगळता जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने सरासरी ७० ते ८० टक्के कमी पाऊस झाल्याने चार महिन्यांच्या मान्सून हंगामाच्या सरासरीत राज्यातील ३६ पैकी ३५ जिल्ह्यांत कमी पावसाची नोंद झाली आहे. यात तब्बल १९ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये गणले गेले. तर, एकूण ३५८ पैकी तब्बल २९८ तालुक्यांत दुष्काळी स्थिती आहे.
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते २९ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात ८०१.५ मि.मी. पाऊस झाला, राज्याची चार महिन्यांची सरासरी ९८६.७ मि.मी. आहे. राज्यात एकूण सरासरी तूट १९ टक्के गणली गेली आहे. यात सर्वाधिक ३९ टक्के तूट मराठवाडा, विदर्भ २६ टक्के, कोकण प्रथमच १४ टक्के तूट आहे तर मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी ७ टक्के तूट आहे.
मराठवाडा, विदर्भात मोठा दुष्काळ
राज्यात सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात उणे ५९ टक्के इतका झाला आहे. त्यापाठोपाठ मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अत्यल्प पाऊस झाला. यात बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, परभणी जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने हे सर्व जिल्हे गंभीर दुष्काळी ठरले. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांतही गंभीर दुष्काळी स्थिती आहे.
१९ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये (उणे २१ ते उणे ५९ टक्के तूट)
सोलापूर (-५९), बीड (-५०), धाराशिव (-४६), अहिल्यानगर (-४६), हिंगोली (-४९), जालना (-४७), अकोला (-४१), अमरावती (-४२), सिंधुदुर्ग (-३६), नंदुरबार (-३८), लातूर (-३८), परभणी (-३९), बुलडाणा (-२१), चंद्रपूर (-३३), नागपूर (-३३), वर्धा (-३४), वाशिम (-३७), यवतमाळ (-२६), सांगली (-२८).
तालुकानिहाय स्थिती
राज्यात एकूण तालुके : ३५८ (३५५ ग्रामीण-निमग्रामीण, ३ शहरी)
कमी पाऊस (२० ते २५ टक्के) : २९८ तालुके
खूप कमी पाऊस (उणे १९ ते १९ टक्के) : २६५ तालुके (मराठवाडा : ७४, विदर्भ : ३९, उत्तर महाराष्ट्र : ४९, मध्य महाराष्ट्र : ३५, कोकण : १२)