Admission Pudhari
पुणे

Class 11 Admission 2026: अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; 1.81 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश

राज्यभरात 48 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला; पुण्यात 28 हजार 234 विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर केली आहे. यामध्ये १ लाख ८१ हजार ९३१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यापैकी ४८ हजार २५३ विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्रवेश घेतले आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्याला येत्या २५ जूनपर्यंत महाविद्यालयांत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

राज्यातील ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालयातील २२ लाख १४ हजार ४०६ जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन नियमित फेऱ्यांद्वारे ६ लाख ३५ हजार १०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

तर, तिसऱ्या फेरीत कॅपमध्ये ३७ हजार ५१० आणि कोटाअंतर्गत १० हजार ७४३ अशा ४८ हजार २५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या फेरीत एकूण ४ लाख ९५ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी कॅपचा प्रवेश अर्ज लॉक केला होता. तर, ६८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अर्ज लॉक केला होता. त्यापैकी ९० हजार ३४ विज्ञान शाखेच्या, ५१ हजार ७३१ वाणिज्य शाखेच्या आणि ४० हजार १६६ कला शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांना २३ ते २५ जून या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. २६ जून रोजी चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, तर २७ जूनला प्रवेशासाठी उपलब्ध रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असल्याचे माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत कळविले आहे.

पुण्यात २८ हजार २३४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर

पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या यादीसाठी ८९ हजार ६६३ विद्यार्थी पात्र झाले होते. त्यापैकी २८ हजार २३४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. त्यातील १६ हजार ८४२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे ५ हजार ७२७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २ हजार २०० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT