CET Pudhari
पुणे

Maharashtra CET Exam Rules 2026: सीईटी 2026 साठी कडक नियमावली; एआय व डिजिटल कॉपीवरही कारवाई

12.92 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी सीईटी कक्षाचा कठोर निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: 2026 च्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी संपत आली आहे. आजपर्यंत 12 लाख 92 हजार विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर, प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटीला दोन संधी दिल्यामुळे 17 लाख 39 हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या सीईटी परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकाराला अटकाव करण्यासाठी सीईटी कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या सुधारित नियमावलीमध्ये डिजिटल, सायबर व एआय तंत्रज्ञानयुक्त केलेल्या गैरप्रकारासही अटकाव करण्यात येणार आहे.

सीईटी कक्ष 17 अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षा घेते. यातील 15 प्रवेश परीक्षा या महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जातात. या परीक्षेमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर केला, तर त्यासाठी विविध शिक्षा व दंड करण्यात येतो. या गैरप्रकारास अटकाव करण्यासाठी व काही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर झाल्यास त्यांच्या गैरव्यवहाराचे स्वरूप पाहून त्यांना उचित शिक्षा व दंड करण्याची तरतूद असलेली सुधारित नियमावली सीईटी कक्षाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

या सुधारित नियमावलीनुसार गैरव्यवहाराचे स्वरूप पाहून त्यांना शिक्षा व दंड करण्याची तरतूद यामध्ये केली आहे. सीईटी कक्षानी जाहीर केलेल्या या नियमावलीमध्ये 13 प्रकारचे गैरप्रकार, विविध गैरवर्तन, कॉपी केस, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्‌‍सचा गैरवापर, तोतयागिरी, सामूहिक नक्कल, एआय/ डिजिटल साधनांचा वापर, प्रवेशपत्र/ ओळखपत्राशी छेडछाड, शस्त्रे, स्फोटके, धारदार वस्तू बाळगणे अशा प्रकारच्या अनेक गैरप्रकारावर विविध प्रकारच्या शिक्षा व दंड या नियमावलीमध्ये दर्शविल्या आहेत. गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारावर सीईटी परीक्षा बंदी, दंड व इतर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे.

परीक्षेत गैरव्यवहार केल्यास मिळणार शिक्षा

परीक्षेदरम्यान बोलणे, नोट्‌‍स, पुस्तके, सूत्र, पत्रके प्राप्त झाल्यास, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्‌‍स सापडल्यास, तोतयागिरी ,परीक्षा हॉलच्या बाहेरून नोट्‌‍स, उपकरणे, सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रश्न किंवा उत्तरे पाठविणे, सामूहिक कॉपी करणे, एआय/ डिजिटल साधनांचा वापर, प्रवेशपत्र/ ओळखपत्राशी छेडछाड केल्यास, शस्त्रे, स्फोटके, धारदार वस्तू, दारू/ अमली पदार्थाचे सेवन करून किंवा या वस्तू घेऊन परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश केल्यास उमेदवाराची चालू असलेल्या सीईटीची उमेदवारी रद्द केली जाईल व कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांसाठीही कडक नियम

या नियमावलीमध्ये परीक्षा केंद्रांसाठीही कडक नियम तयार केले आहेत. परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही लावणे, बायोमेट्रिक पडताळणी करणे व कडक देखरेख करणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या केंद्राने निष्काळजीपणा केल्यास किंवा गैरवर्तन किंवा गैरकृत्यात सहभाग आढळल्यास, सीईटी कक्ष अशा परीक्षा केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द करू शकते, संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करू शकते किंवा आर्थिक किंवा प्रशासकीय दंड लावू शकते. सदरची नियमावली 2026 च्या सीईटी परीक्षेमध्ये वापरली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT