Balbharati Class 4 Textbook Pudhari
पुणे

Balbharati Class 4 Textbook: बालभारतीच्या चौथीच्या गणित पुस्तकात मोठे बदल; जीवनाधारित शिक्षणावर भर

गणिताला दैनंदिन जीवनाशी जोडून शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नवीन पाठ्यपुस्तकात संकल्पनात्मक शिक्षणावर भर देण्यात आला आहे, मात्र काठिण्यपातळी वाढल्याचीही चिंता व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: गणिताचा अभ्यास केवळ पाठांतराच्या स्वरूपात न शिकवता घरातील वस्तू, बाजारातील व्यवहार, घड्याळ, दिनदर्शिका आणि खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्यासाठी त्यांची तर्कशक्ती, आत्मविश्वास आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करायची आणि 'गणित म्हणजे अवघड विषय' ही भीती दूर करून 'गणित म्हणजे जीवनाचा भाग' ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याकडे 'बालभारती'चा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात येणार आहे. चौथीच्या गणिताच्या पुस्तकात १४ प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय संकल्पना मजबूत करणे, हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. संबंधित पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ आकडेमोड शिकवणारे नसून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, खेळ, चित्रे, तक्ते आणि उदाहरणांच्या माध्यमातून गणित समजून घेण्यास मदत करणारे आहे.

'संख्याशी खेळूया' या पहिल्या प्रकरणातून विद्यार्थ्यांना हजार, दहा हजार, लाख यांसारख्या मोठ्या संख्यांची ओळख होणार आहे. संख्या वाचणे, लिहिणे, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप, या बाबी सुलभ भाषेत समजावून सांगण्यात आल्या आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चढता क्रम-उतरता क्रम, सम संख्या, विषम संख्या या मूलभूत गणितीय क्रियांचा अधिक सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना विविध पद्धतींनी उदाहरणे सोडवण्याचा सराव करून घेण्यात येणार आहे.

अर्धा, पाव, तीनचतुर्थांश यांसारख्या अपूर्णांकांची संकल्पना 'अपूर्णांक' या प्रकरणात चित्रांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली आहे, तसेच यातून समान भागांमध्ये विभागणी कशी करावे, हे समजणार आहे. लांबी, वजन, क्षमता आणि वेळ यांसारख्या दैनंदिन जीवनातील मापनपद्धती शिकवल्या जाणार आहेत. तर मीटर, सेंटिमीटर, किलोग्रॅम, लिटर आणि मिनिट-तास यांचा वापर कसा करायचा, हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. घड्याळ वाचणे, वेळेचे नियोजन, दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष यांची माहिती देऊन दिनदर्शिकेचा वापर करून तारखा शोधण्याचा सरावही विद्यार्थ्यांकडून करून घेतला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना वस्तूंमधून कळणार भूमितीय संकल्पना

विद्यार्थ्यांचा भूमितीचा पाया पुढील काळात पक्का व्हावा, यासाठी रेषा, बिंदू, कोन, त्रिकोण, चौकोन, आयात, वर्तुळ यांसारख्या आकृत्यांची ओळख करून वस्तूंमधून भूमितीय संकल्पना समजाविण्यात आल्या आहेत. पुस्तकात फक्त उदाहरणे सोडविण्यावर भर नसून, विविध उपक्रम, खेळ, चर्चा, निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवांद्वारे गणित शिकवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित हा विषय डोकेदुखी न ठरता अधिक रंजक वाटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गणिताची काठिण्यपातळी अधिक

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करता इयत्ता चौथीच्या गणित पुस्तकातील मांडणी ही विद्यार्थ्यांना रंजक वाटण्याऐवजी डोकेदुखीच ठरते की काय? अशी भीती आहे. कारण, भूमितीय संकल्पनांसह अन्य काही संकल्पना या विद्यार्थ्यांना घाम फोडणाऱ्या दिसत असल्याची माहिती पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या गणिततज्ज्ञांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT