पुणे: राज्यातील यंदाचा गाळप हंगाम २०२६-२७ साठी साखर आयुक्तालयामार्फत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केलेल्या एकूण दोनशे साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आलेले आहेत. आयुक्तालया कडून मंजूर परवानाधारक कारखान्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे.
तरी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परवाना नसलेल्या कारखान्यांना आपला ऊस गाळपासाठी पुरवू नये आणि स्वतःची फसवणूक टाळावी, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
साखर आयुक्तालयाने यंदाच्या गाळप हंगामासाठी आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता केलेल्या दोनशे साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. त्यामध्ये ९९ सहकारी आणि १०१ खासगी साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे नमूद करून साखर सह संचालक (विकास) महेश झेंडे यांनी म्हटले आहे की, ज्या साखर कारखान्यांकडे वैध गाळप परवाना उपलब्ध आहे, अशाच कारखान्यांना शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी द्यावा.
परवाना नसलेल्या किंवा अनधिकृत कारखान्यांना ऊस पुरवठा करू नये. परवानाधारक कारखान्यांची सविस्तर व अद्ययावत यादी साखर आयुक्तालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://maha sugar.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकृत संकेत स्थळावला भेट देऊन खात्री करूनच आपल्या उसाचे नियोजन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.