पुणे: राज्यात यंदाही अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक आणि त्वरित भरण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शासकीय, अनुदानित विद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्राची स्थापना करावी. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी साहाय्य करावे, विद्यार्थी, पालक, शाळा, विद्यालयांसाठी उद्बोधन वर्गांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी प्रथमच राज्यभरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. परंतु प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहिली. त्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे अर्ज करावा. अन्य मंडळाशी संलग्न शाळांतून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळ संलग्न महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करता येईल. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार आणि निकषांनुसार ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येईल. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने शाळांना प्रवेश करता येणार नाही.
प्रवेशासाठी महाविद्यालय शोधणे, शाखा, माध्यम, प्रवेशक्षमता, रिक्त जागा तपासणे, अर्ज करणे अशा सुविधा उपलब्ध होतील. प्रवेश प्रक्रियेत केंद्रीभूत प्रवेश, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा उपलब्ध असेल. प्रवेश प्रक्रियेसाठी घटनात्मक आणि समांतर आरक्षण लागू असेल. घटनात्मक आरक्षणाअंतर्गतच्या जागा पहिल्या तीन नियमित फेऱ्यांअंतर्गत त्या त्या प्रवर्गातून भरण्यात येतील. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये राखीव प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनो, कागदपत्रे तयार ठेवा!
प्रवेश अर्जाचा भाग एक भरताना आरक्षण, गुणांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे जोडावी लागतात. तसेच प्रवेश निश्चित करताना संबंधित प्रमाणपत्रांची मूळ प्रत सादर करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित प्रमाणपत्रे वेळेपूर्वीच प्राप्त करून ठेवावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.