पुणे: राज्यात बाजारपेठांमधील बियाणे किमतींवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचे काम आजही अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चोखपणे पार पाडत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व अतिशय शुद्ध बियाणे पुरवठा केला जात आहे.
त्यामध्ये महाबीजचे भागधारक, बीजोत्पादक शेतकरी, विक्रेते, कृषी विभाग, कृषी विद्यापीठांचे आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्यामुळे महाबीजने आज यशस्वीपणे 50 वर्षे पूर्ण केले असल्याचे गौरवोद्गार महाबीजचे उपमहाव्यवस्थापक (विपणन) प्रकाश ताटर यांनी येथे काढले.
महाबीजच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे विभागीय कार्यालयात ताटर, पुणे विभागीय व्यवस्थापक प्रवीण देशमुख, जिल्हा व्यवस्थापक पुरुषोत्तम फाटे, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे व्यवस्थापक हेमंत चिमुरकर यांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कानू रामभाऊ ढेरंगे (रा. गुळाणी, ता. राजगुरुनगर, जि. पुणे) यांनी सोयाबीन, फुले, दूर्वा या वाणाच्या मूलभूत ते पायाभूत उत्पादन कार्यक्रमातून एकरी 18 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला.
किसन वालगुडे (रा. मार्गासने, ता. राजगड, जि. पुणे) यांनी भात इंद्रायणी या वाणाचे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेऊन भातामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. वजय शंकर जाधव (रा. अतीत, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) यांनी रब्बी ज्वारी परभणी सुपरमोती या वाणाचे प्रतिएकरी विक्रमी 16 क्विंटल इतके उत्पादन घेतल्याबद्दल गौरविण्यात आले. याच गावचे शेतकरी विलास माधवराव जाधव यांनाही महाबीज उत्पादनातील विशेष बाब म्हणून सन्मानित करण्यात आले.