नारायणगाव: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे महागाईचा भार वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे दिसून येत आहे.
तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी (दि. ६) रात्री उशिरा ही दरवाढ जाहीर केली. त्यामुळे १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांपर्यंत पोहचली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असल्याने कुटुंबांच्या मासिक खर्चात आणखी वाढ होणार आहे.
यापूर्वी मार्च महिन्यातही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर अतिरिक्त ताण पडत आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून चुली पेटल्याचे दिसून येत होते. आता चुलींचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केंद्र सरकारने ग्राहकांवरील संपूर्ण भार टाळण्यासाठी काही प्रमाणात अनुदान सुरू ठेवले आहे. मात्र, वाढत्या जागतिक इंधनदरांमुळे दरवाढ अटळ ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महागाईने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना या नव्या दरवाढीचा मोठा फटका बसणार असून, घरगुती अर्थसंकल्प कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध ग्राहक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सतत गॅसची किंमत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला गॅस परवडत नाही. आता चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही. इतर देशांच्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या असल्याचे सरकार सांगत असले, तरी निवडणुकीत झालेला खर्च सामान्यांकडून वसूल करण्याचा प्रयत्न दिसत आहे. आता सामान्यांनी जगायचे कसे?प्रियंका शेळके, गृहिणी
उपयोगी सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. रॉकेल मिळत नाही. चुली पेटवायच्या म्हटले, तर सरपण देखील नाही. गॅस दरवाढ वारंवार होऊ लागल्याने आर्थिक बजेट कोलमडणारच. सरकारने पर्यायी व्यवस्था करून गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात आणि महिलांचा दुवा घ्यावा.शीतल गावडे, गृहिणी