

पुणे: पुणे-नगर महामार्ग आणि शिरूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरदवाडी घाटात भरदिवसा झालेल्या खळबळजनक खून प्रकरणानंतर या भागातील टोळी संघर्ष, गुन्हेगारांचे वाढते जाळे आणि त्यांना मिळणाऱ्या कथित राजकीय पाठबळाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्यातील एक मांडवली बादशाह यामागे असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील आठवड्यात सरदवाडी घाटात एका कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शिरूरमधील तत्कालीन नगरसेवक महेंद्र मल्लाव खून प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. मृत आणि आरोपी हे पूर्वी एकाच गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
दरम्यान, पुणे-नगर महामार्गावर आणि शिरूर परिसरात गेल्या काही वर्षांत खून, खंडणी, जमीनवाद आणि टोळी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील गुन्ह्यांनंतर फरारी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनांनीही नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.
स्थानिक पातळीवर काही गुन्हेगार टोळ्यांना प्रभावशाली राजकीय घटकांचे संरक्षण मिळत असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. जमीन व्यवहार, बांधकाम क्षेत्र आणि मालमत्ता ताब्याच्या वादांमध्ये गुन्हेगारांचा वापर होत असल्याचे आरोपही वारंवार पुढे येत आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पातळीवर पुष्टी झालेली नाही.
पोलिस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना तडीपार केले असले, तरी काही आरोपींमध्ये पोलिसांचा धाक कमी झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. गुन्हेगारांची नियमित तपासणी, हजेरी आणि प्रतिबंधात्मक कारवाया पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचीही चर्चा परिसरात आहे.
कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी गुन्हेगार आणि राजकीय हस्तक्षेप यांच्यातील कथित संबंधांवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. पोलिसांना स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बड्या नेत्याचा पंटर आहे 'बॉस'
पुण्यातील एका बड्या नेत्याचा पंटर या सर्व प्रकारामागील मास्टर माइंड असल्याची चर्चा या भागात आहे. काही गुन्हेगारांना त्याच्याकडून बळ मिळत असून, त्या जोरावर रांजणगाव एमआयडीसीतील कंत्राटे, जमिनींचे मॅटर वाजवले जात आहेत. या बड्या नेत्याच्या पंटरला पोलिसही वचकून आहेत.