

शिक्रापूर: पाबळ आणि केंदूर गावच्या हद्दीवरील एका भरलेल्या जुगार अड्ड्यावर चोरट्यांनी सशस्त्र धाड टाकून मोठी रक्कम आणि सोनसाखळी, अंगठी व दागिने चोरी केल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसात जावे तर कायद्यात अडकाव, यामुळे 'हाक ना बोंब, पाच लाखांना चुना' अशी खुमासदार चर्चा पाबळ-केंदूर परिसरात सुरू आहे. साधारणपणे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती आता चर्चेत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावांच्या सीमेवरील एका निर्जन ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा होती. दरम्यान, पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी प्रवेश केला. या वेळी या व्यक्तींकडे पिस्तूल, चाकू अशी हत्यारे होती. या शस्त्राच्या जोरावर या चोरट्यांनी सुमारे पाच ते सात जणांना धाक दाखवीत रोख रक्कम व इतर साहित्यावर हात साफ केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर संबंधितांनी पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. चोरट्यांना या अड्ड्याची खबर कशी लागली? अथवा कोणी गेम केला? याचीच चर्चा केंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशेष म्हणजे, कथित जुगार अड्ड्यावर चोरी झाल्याची माहिती गावोगावी वाऱ्यासारखी पसरली असली, तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे नेमके किती नुकसान झाले? चोरी कधी झाली? आणि कोणत्या वस्तू चोरीस गेल्या? याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. परिसरातील नागरिकांमध्ये मात्र या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, बेकायदेशीर प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारच्या अड्ड्यांवर संबंधित यंत्रणांनी लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत पोलिस तक्रार अथवा पुष्टी उपलब्ध झाल्यानंतरच घटनेचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या परिसरात सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.