Lonikand Dowry Death Pudhari
पुणे

Lonikand Dowry Death: लोणीकंदमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार; छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पैशांच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून छळ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: लोणीकंद (ता. हवेली) परिसरात हुंडाबळीची संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणारा सततचा शारीरिक, मानसिक छळ आणि पैशांच्या हव्यासापोटी एका विवाहितेने जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी यशवंत लाटे (वय 22, रा. गोकुळ पार्क, लोणीकंद), असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी वैष्णवीची आई गंगाबाई अशोक जामकर (वय 48, रा. वडगाव गुंडा, जि. बीड) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वैष्णवीचा पती यशवंत शिवनाथ लाटे (वय 28), सासू सखूबाई लाटे (वय 50), सासरे शिवनाथ लाटे (वय 55) आणि दीर सूरज लाटे (सर्व रा. गोकुळ पार्क, बकोरी रोड, लोणीकंद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी सासरी नांदत असताना मे 2025 पासून तिला सासरच्या मंडळींनी लक्ष केले होते. ‌’तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये‌’ अशी वारंवार मागणी करीत तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. सासरच्या या जाचाला कंटाळून अखेर वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती डंबाळे आणि तुकाराम सुरवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

लोणीकंदसारख्या सुशिक्षित शहराच्या वेशीवर हुंड्यासाठी एका तरुण विवाहितेचा अशा प्रकारे अंत झाल्याने जनसामान्यांमधून तीव संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा ‌’वैष्णवी हगवणे‌’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT