Lift Accident Pudhari
पुणे

Loni Kalbhor Lift Incident: लोणी काळभोरमध्ये १९ वर्षीय तरुणी लिफ्टमध्ये १४ तास अडकली; सकाळी वीज आल्यानंतर सुटका

पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान लिफ्ट बंद; रात्रभर अंधारात अन्न-पाण्याविना काढले क्षण, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोणी काळभोर येथील एका शैक्षणिक संकुलातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये १९ वर्षीय तरुणी तब्बल १४ तास अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सकाळी सहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर या तरुणीची सुटका झाली.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही तरुणी लिफ्टमध्ये अडकली. संपूर्ण रात्र तिला लिफ्टमध्ये काढावी लागली. या प्रकारामुळे नामांकित महाविद्यालये, तसेच शासकीय, खासगी कार्यालये असलेल्या व्यावसायिक इमारतींमधील सुरक्षा यंत्रणा, इमर्जन्सी अलार्म आणि बॅकअप पॉवर या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील ही विद्यार्थिनी लोणी काळभोर येथील एका शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती लिफ्टने खाली येत होती. त्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान अचानक बंद पडली.

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत विद्यार्थी व इतर लोक खाली आल्याने तिचा आवाज कोणाला ऐकायला आला नाही. संपूर्ण रात्र तिला अंधारात आणि अन्न पाण्याविना लिफ्टमध्ये काढावी लागली. इकडे मुलगी वेळेत घरी न आल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. लोणी काळभोर पोलिसांकडे त्यांनी ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, तिचा शोध लागत नव्हता.

दरम्यान, सकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. एका महिलेने लिफ्टचे बटन दाबल्यावर लिफ्ट सुरू होऊन दरवाजा उघडला गेला. तेव्हा आतमध्ये ही तरुणी असल्याचे दिसून आले. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. लिफ्टमधून तिची सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांनी आमची काही तक्रार नाही, असे सांगितले आहे. तरीही या संपूर्ण प्रकारात तांत्रिक जबाबदारी कोणाची आहे, याची आम्ही चौकशी करीत आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT