पुणे : म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली आहे. म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देता का घर, अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 3) म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेराव घातला. (Latest Pune News)
या वेळी नागरिकांनी म्हाडाच्या आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. याप्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्यनगर बचाव कृती समिती, तर अजय बल्लाळ यांनी महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा कृती समिती येथील रहिवाशांची बाजू मांडली.
नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या, आमच्या घरांवर विकासकांवर आणलेली स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली. रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकास करू द्या. यावेळी नागरिकांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहुल समोरे यांना भेटून नागरिकांनी निवेदन दिले.
गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला खीळ बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या. नागरिक म्हणाले की, लोकमान्यनगर येथील काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरकयातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. येथील सर्व इमारती कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली
महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करत आहोत. म्हाडाने आणि राज्य शासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे. शासनाकडून त्वरित दखल जोपर्यंत घेतली जात नाही. तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर कृती समिती व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने सांगण्यात आले.
येरवड्यातील म्हाडा कार्यालयाला घेराव घालून निदर्शने करताना लोकमान्यनगर बचाव समितीचे सदस्य.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) महाराष्ट्रभर गृहनिर्माणाची कामे करते आहे. मात्र महाराष्ट्रभर आपण पाहिले तर म्हाडाच्या बांधकामांची आणि नागरिकांची अवस्था चिंताजनक आहे.ॲड. गणेश सातपुते, लोकमान्यनगर बचाव समिती