Ketan Agrawal Murder Case Pudhari
पुणे

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्या प्रकरण: आरोपी चेतन चौधरीला घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशन; तपासाला वेग

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांकडून घटनाक्रमाची पुनर्रचना; जबाबांची पडताळणी, लोहगड सकाळपर्यंत पर्यटकांसाठी बंद

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक तीव्र केली आहेत. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला बुधवारी (दि. १) सकाळी अत्यंत कडक पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण घटनेचे सीन रिक्रिएशन (घटनाक्रम पुनर्रचना) केले. या कारवाई वेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

१८ जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून खोल दरीमध्ये पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता हा अपघात नसून, एक पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेला घातपात असल्याचे समोर आले.

याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही ३ जुलैपर्यंत वाढीव पोलस कोठडी सुनावली आहे. सियाने दिलेल्या माहितीची आणि चेतनने सांगितलेल्या घटनाक्रमाची आपसात जुळवणी होते की नाही. तसेच, दोघांच्या जबाबात काही तफावत आहे का, याची उलटतपासणी करण्यासाठी हे सीन रिक्रिएशन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संवेदनशील कारवाईदरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून आज सकाळी ११ वाजेपर्यंत लोहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

'त्या' ठिकाणाला 'सिया पॉइंट' म्हणू नका! शिवप्रेमींचे आवाहन

जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी पिंपरी चिंचवड येथील युवा उद्योजक केतन अग्रवाल यांचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला होता. तपासामध्ये दोन दिवसांनंतर हा अपघात नसून, पूर्वनियोजित कट व हत्या असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले होते.

त्यामुळे लोहगडावरील हा पॉइंट नेमका आहे तरी कुठे, हे पाहण्यासाठी पर्यटकांची लोहगड किल्ल्यावर गर्दी होऊ लागली आहे. अनेक पर्यटक व नेटकरी या ठिकाणाला 'सिया पॉइंट' असे संबोधू लागल्यामुळे शिवप्रेमींनी संताप व नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT