पिंपरी : टीम पुढारी : दोन वषार्ंपूर्वी मार्च महिन्यात शहरात कोरोनाची लाट आली आणि 25 मार्च 2020 ला कडक लॉकडाऊन लागले. शहरात सर्व काही स्तब्ध झाल्याचे चित्र होते.
अत्यावश्यक सेवा सोडल्या तर कोणालाही बाहेर फिरकण्याची परवानगी नव्हती. कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली तर कधी मृत्यूच्या भयाने दोन वर्षे नागरिकांनी घालविली.
कधी लॉक तर कधी अनलॉकला नागरिक कंटाळले होते. आता नागरिकही कोरोनासह जगायला शिकले आहेत. कोरोनाच्या तीन लाटांनतर शहरवासीयांनी मात करुन जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट होण्यापूर्वी उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. कोरोनाकाळात दोन वर्षांपूर्वी पहिल्या लॉकडाऊनमध्ये उद्योगनगरीतील सर्व उद्योग क्षेत्रातील यंत्राचा आवाज बंद झाला.
मार्च अखेर लॉकडाऊन झाल्यामुळे उद्योगक्षेत्राला मोठा फटका बसला. त्यामुळे उद्योगक्षेत्राचे अंदाजे 20 हजार कोटीपर्यंतचे नुकसान झाले.
लॉकडाऊन हळहळू उघडल्याने 50 टक्के कामगारांना परवानगी दिल्यानंतर उद्योग सुरू झाले. उद्योगक्षेत्राच्या यंत्राचा आवाज पुन्हा शहरामध्ये घूमू लागला आहे. सध्या सर्वच ठिकाणी कामगार व कर्मचार्यांना शंभर टक्के परवानगी असल्याने कंपन्या तीन शिप्टमध्ये सुरू झाल्या आहेत.
ज्या प्रमाणे आधुनिकीकरण होत आहे. त्याप्रमाणे उद्योगक्षेत्रही नवनवीन निर्मितीकडे वळत आहे. इलेक्ट्रिक वाहने आल्याने उद्योगांना पुन्हा नवीन आव्हान निर्माण झाले. प्रत्येकजण आता या क्षेत्रात निर्मिती करत आहे. त्यामुळे आर्थिक झळ सोसूनही उद्योग हे मागे न पडता नवीन आव्हाने घेवून भरारी घेत आहेत.
ऐन मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर सणवार आणि लग्नसराई यावर निर्बंध आले. सणवार आणि लग्नसराई यामध्ये व्यापार्यांना सुगीचे दिवस असतात.
पहिल्या लॉकडाऊन लागल्यानंतर नागरिकांनी लग्ने पुढे ढकलली, सणवार साध्या पद्धतीने साजरे करायचे ठरले. त्यावेळी कपडे, ज्वेलरी, इतर वस्तूंच्या दुकाने बंद होती.
व्यापार्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला. काहींचा माल इतर ठिकाणी अडकला तर काहींचा आणलेला माल लॉकडाऊन लवकर न उघडल्यामुळे खराब झाला. वर्षभरात बाजारपेठेत 10 कोटींची उलाढाल होत होती. लॉकडाऊनमुळे व्यापार्यांना मोठ्या प्रमाणात याची आर्थिक झळ बसली.
दोन वर्षांनी आता निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे दुकाने पूर्ण वेळी खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. सुरुवातीला घराबाहेर पडायला घाबरणारे नागरिक आता बाजारात जावून दिलखुलासपणे खरेदी करायला लागले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात आता समाधान आहे.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाची लाट आल्यानंतर देशभरात लॉकडाऊन होण्यापूर्वी सर्वात आधी शाळा बंद करण्यात आल्या. यावेळी बोर्डाच्या परीक्षा संपल्या होत्या म्हणून फारशी अडचण आली नाही.
ऐन परीक्षांच्या काळात शाळा बंद केल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि शाळांमध्ये ऑनलाइन अॅक्टिीव्हीटीज सुरू ठेवण्यात आल्या.
जून महिन्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, असे वाटले पण कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे ऑलाईन शैक्षणिक वर्ष जाहीर करण्यात आले. सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण हे सर्वसमावेशक नव्हते. शिक्षण घेताना बर्याच अडचणी आल्या.
शिक्षकांनाही ऑनलाईन शिकविण्याचे तंत्र नव्हते. विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनचा आभाव होता. तरीदेखील ऑनलाईन व स्मार्टफोन नसणार्यांना ऑफलाईन शिक्षण देण्याचा दोन वर्षे प्रयत्न केला गेला.
सध्या तिसर्या लाटेनंतर शिक्षण हे पूर्वप्राथमिक पासून ते महाविद्यालयापर्यंत ऑफलाइन सुरू झाले आहे. दोन वर्षे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही भरुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑफलाइन शाळेमुळे दोन वर्षे ओसाड पडलेल्या शाळा पुन्हा गजबजल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पहिल्या कडक लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा व पीएमपीएल सेवा बंद होती. मात्र, कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता रेल्वे व पीएमपीएल सेवा 90 ते 95 टक्के सुरू झाली आहे.
त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून एसटी बसचा संप सुरू असल्याने एसटी प्रवाशांना मात्र खासगी बस व खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनपूर्वी मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या 300 गाड्या व 42 लोकल पुणे लोणावळा मार्गावर धावत होत्या. पहिल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांची आपापल्या गावी जाण्यासाठी चाललेली धडपड पाहून काही प्रमाणात रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
मात्र, त्यांचे नियम अतिशय किचकट होते. दुसर्या लाटेनंतर टप्याटप्प्याने 50 टक्के, 60 टक्के व आता 90 टक्के रेल्वे मार्गावर धावत आहेत.
लांब पल्ल्याच्या 230 रेल्वे गाड्या धावत आहेत तर पुणे-लोणावळा मार्गावर 20 लोकल धावत आहेत. कडक लॉकडाऊन काळात पीएमपीएमएलच्या फक्त 300 बस त्याही अत्यावश्यक सेवेसाठी धावत होत्या.
दुसर्या लाटेत एक हजार ते अकराशे बस मार्गावर आल्या तर तिसरी लाट ओसरल्यावर आता दीड हजार बस मार्गावर धावत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह खाकीलाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. मात्र, यावेळी पोलिसांनी वर्क फ्रॉम होम आणि ठाणेस्तरवर घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोना हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.
तिसर्या लाटेत 287 पोलिस कोरोनमुक्त झाले आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात पहिल्या लाटेत 643, दुसर्या लाटेत 289 आणि तिसर्या लाटेत 287 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.
कोरोनाशी हात करताना एकूण पाच कर्मचार्यांना आत्तापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती.
ठाणे स्तरावर खबरदारीचे नियम पाळणे बंधनकारक केले होते. मास्क शिवाय पोलिस ठाण्यात इंट्री बंद केल्याचाही यावेळी मोठा फायदा झाल्याचे दिसून आले.
याव्यतिरिक्त पंचावन्न वयापेक्षा जास्त असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले. एकंदरीत पोलिसांनी घेतलेल्या या विशेष खबरदारी मुले पोलिस दलातील कोरोना हद्दपार झाला.
कोरोनाचा महाफटका बसलेल्या बांधकाम क्षेत्राने पिंपरी-चिंचवड शहरात मोठी उभारी घेतली आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर येऊन या क्षेत्राने भरारी घेतली आहे.
शहरात मोठ्या संख्येने गृह व व्यापारी प्रकल्प उभे राहत आहे. दर स्थिर असल्याने सदनिकांना मागणी आहे. गुंतवणुकीपेक्षा राहण्यासाठी सदनिकांना पसंती दिली जात आहे.
परिणामी, महापालिकेकडे बांधकाम परवानगीचे घेण्याची संख्या वेगात वाढली आहे. बांधकाम परवानगी शुल्कामुळे त्या विभागाचा महसुलही वाढला आहे. एक एप्रिल 2021 ते 24 मार्च 2021 पर्यंत विक्रमी 935 कोटींचे उत्पन्न बांधकाम विभागास मिळाले आहे.
या विभागाचे गेल्या दोन वर्षांत उत्पन्न घटले होते. सन 2019-20 या अर्थिक वर्षांत 581 कोटी 4 लाख आणि सन 2020-21 या कालावधीत एकूण 328 कोटी 91 लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 ला कोरोनाचे पहिले तीन रुग्ण सापडले. त्यानंतर ती संख्या हळूहळू वाढत केली. पहिला, दुसर्या व तिसर्या लाटेत आजपर्यंत तब्बल 3 लाख 59 हजार 120 जणांना कोरोनाची लागण झाली.
त्यात सर्वांधिक पुरूष रुग्णांचा तसेच, जुने आजार व ज्येष्ठांचा समावेश आहे. कोरोनावर तब्बल 3 लाख 55 हजार 160 जणांनी मात केली. तर, 4 हजार 624 रुग्ण दगावले. दुसर्या लाटेत मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली.
मृतांमध्ये अनेक कुटुंबाचे कर्ते पुरूष होते. आतापर्यंत तब्बल 29 लाख 1 हजार 100 नागरिकांची अॅन्टीजेन व आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात आली.
एका व्यक्तीची अनेकदा चाचणी झाल्याने ती संख्या फुगली आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे एकूण 34 लाख 81 हजार 682 डोस देण्यात आले. एकाला दोन डोस व बुस्टर डोस असे तीन डोस दिल्याने ती संख्या अधिक दिसत आहे.
सर्वांधिक 30 लाख 41 हजार 567 कोविशिल्डचे डोस आहेत. कोव्हॅक्सीनचे 4 लाख 8 हजार 666, कोर्बेव्हॅक्सचे 808, स्पुटनिकचे 30 हजार 641 डोस देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थिती :