मुंब्रा येथून गावठी कट्टा जप्त; आरोपीस अटक | पुढारी

मुंब्रा येथून गावठी कट्टा जप्त; आरोपीस अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एका इसमाने उत्तर प्रदेश येथून गावठी कट्टा विक्रीसाठी आणून तो मुंब्रा येथील निर्जनस्थळी लपवून ठेवला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा सोनू गुरुप्रसाद पटवा असे या आरोपीचे नाव आहे.

सोनू गुरुप्रसाद पटवा हा सराईत चोरी करत असल्याची माहिती बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असता, या इसमाने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उत्तर प्रदेश येथून गावठी कट्टा मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे त्‍याने सांगितले.

त्यानंतर सखोल चौकशी केली असता, हा संशयीत आरोपी पूर्वी राहत असलेल्या दिवा अगासान रोडवरील निर्जनस्थळी हा गावठी कट्टा लपवल्‍याचे त्‍याने कबूल केले. त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी गावठी कट्टा ताब्यात घेतला आहे. या आरोपीवर हत्यार कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Back to top button