कुत्र्यांच्या प्रतिकाराने जंगलात काढली माघार File Photo
पुणे

Leopard Kondgaon: सिंहगड पायथ्याला बिबट्याचे थरारनाट्य; कुत्र्यांच्या प्रतिकाराने जंगलात काढली माघार

कोंडगाव परिसरात पहाटेची घटना; ऐन दिवाळीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे : सिंहगड किल्ल्याच्या परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, गुरुवारी (दि. 16) पहाटे कोंडगाव (ता. राजगड) येथे बिबट्याचे थरारनाट्य घडले. स्वप्निल वासुदेव दारवटकर यांच्या घराशेजारी चक्क बिबट्याने कुर्त्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला; मात्र चार-पाच कुर्त्यांनी हल्ला परतवून लावत बिबट्याला जंगलाचा रस्ता दाखवला. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.(Latest Pune News)

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्याचा आवाज उठला. या आवाजाने घराच्या छतावर झोपलेले स्वप्निल दारवटकर जागे झाले. या वेळी त्यांना घराच्या भिंतीलगत एक अक्राळविक्राळ बिबट्या दिसला. याच बिबट्याने दारवटकर यांच्या घराशेजारी असलेल्या कुर्त्यांवर झडप घातली.

मात्र कुर्त्यांनी झुंडीने बिबट्याला प्रतिकार केला. कुत्र्यांच्या आक्रमकतेमुळे बिबट्याने मागे हटत क्षणातच शेजारच्या जंगलात धूम ठोकली. बिबट्या व कुत्र्यांचे हे थरारनाट्य दोन-तीन मिनिटे सुरू होते.

या घटनेची माहिती मिळताच सायंकाळी वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुने व वनरक्षक निंबोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ‌‘दारवटकर यांच्या घराशेजारी पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे ठसे आढळले असून तो सिंहगडच्या जंगलातून नागरी वस्तीत घुसत असल्याची शक्यता आहे.‌’

या घटनेने कोंडगाव, मोगरवाडी, रांजणे, मालखेड, थोपटवाडी या भागात ऐन दिवाळीत भीतीचे सावट पसरले आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने मालखेड, थोपटवाडी व आनंदवन परिसरात गाई, वासरे, कुत्री अशी 10 जनावरे ठार मारली आहेत. वनरक्षक राजेंद्र निंबोरे म्हणाले, ‌‘चार-पाच कुत्र्यांनी एकाच वेळी आक्रमक पवित्रा घेत बिबट्याच्या अंगावर धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने शिकार सोडून पळ काढला.‌’

दरम्यान राजगड वन विभागाच्या वतीने सिंहगड खोऱ्यात तसेच पानशेत परिसरात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, ‌’या परिसरातील घनदाट जंगल बिबट्यांसह वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासस्थान आहे. त्यामुळे नागरिकांनी सायंकाळनंतर शेतात जाऊ नये आणि जनावरे मोकाट सोडू नयेत. बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा.‌’

पुणे जिल्हा दूध संघाचे

माजी अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, ‌‘कोंडगाव-मोगरवाडी परिसराच्या सभोवती दाट जंगल असल्याने बिबट्या अधूनमधून गोठ्यात व वस्त्यांत शिरतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा.‌’

दारवटकर कुटुंबीयांनी अनुभवला थरार

‌‘घराच्या भिंतीलगत बिबट्या पाहताच अंगाचा थरकाप उडाला. काही क्षणांसाठी सर्वांची बोलती बंद झाली,‌’ असे स्वप्निल दारवटकर यांनी सांगितले. घराशेजारी बिबट्याचे ठसे स्पष्ट उमटले असून कुर्त्यांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT