

पुणे : महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी सर्व आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. त्यांना विविध योजनांमार्फत आर्थिक सक्षम करण्याकरिता सर्वांनीच कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा नाबार्डच्या मुख्य सरव्यवस्थापिका रश्मी दराड यांनी व्यक्त केली. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबध्द आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विक्रीकेंद्र मिळवून देण्याबाबत नाबार्डमार्फत निश्चितच प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले. (Latest Pune News)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) आणि राष्ट्रीय कृषी व ग््राामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) संयुक्त विद्यमाने दीपावली महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (दि.15) दराड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रतिभा उभे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले असून दीपावली महोत्सव हा 15 ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बी. जे. रोडवरील मुख्यालयाच्या प्रांगणात भरविण्यात आला आहे.
या वेळी पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, नाबार्डचे विनीत भट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, पुणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, प्रवीण शिंदे, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेच्या बचत गटाच्या प्रमुख तृप्ती कांबळे यांनी तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई यांनी मानले.
जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील दीपावली महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन करताना नाबार्डच्या मुख्य सरव्यवस्थापिका रश्मी दराड. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे व उपस्थित मान्यवर.
दीपावली महोत्सवामुळे बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. या महोत्सवाचा फायदा महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये निश्चितच होणार असून महिलांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या बचत गटांचे कार्य कौतुकास्पद आहे.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित