

पुणे : दिवाळीचा सण जवळ आला की, प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करण्याची ओढ निर्माण होते. हीच ओढ आता न्यायालयीन मार्गाने व्यक्त होत आहे. पुण्यातील जिल्हा व सत्र न्यायालयासह विभागीय आयुक्त कार्यालय तसेच कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांसह वकीलवर्गाची धावपळ सुरू असल्याचे चित्र गुरुवारी न्यायालयात दिसून आले. या वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज जामीन, पॅरोल आणि मुलांच्या तात्पुरत्या ताब्यासाठीच्या अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे वकीलवर्गाकडून सांगण्यात आले.(Latest Pune News)
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या काळात कारागृहात असलेला आपला माणूस आपल्याबरोबर असावा, कौटुंबिक वादामुळे दुरावलेल्या मुलांचा सणासुदीच्या काळात सहवास लाभल्यास दिवाळी सार्थकी लागेल या भावनेतून पक्षकार न्यायालयात गर्दी करू लागले आहेत. सद्यःस्थितीत दैनंदिन कामकाजाचाच भाग असलेल्या साक्ष नोंदविणे तसेच रिमांडच्या कामासह प्रलंबित जामीनाच्या प्रकरणांना प्राधान्य दिले जात आहे. सुट्यांमुळे जामीनपात्र कैदी दिवाळीपासून वंचित राहू नये यासाठी न्यायालयातही कायद्याच्या चौकटीत राहून जामीन मंजूर करण्यात येत आहे.
स्थानिक पोलिसांचा अहवाल, कारागृह प्रशासनाचा अहवाल घेऊन वकील विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पॅरोल मंजूर करवून घेत आहेत. तर, दिवाळीच्या सणासाठी मुलांचा तात्पुरता ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात अर्जांची संख्या वाढली आहे. न्यायालयाची मंजुरी मिळाल्यास मुलासह मुलीला घरी आणून त्यांसमवेत दिवाळी करण्याची उत्सुकता पालकांमध्ये लागली असल्याचे ॲड. ऋ तुराज पासलकर यांनी सांगितले.
दिवाळीच्या सुटीत मुलांचा सहवास मिळावा, त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवता यावेत, यासाठी अनेकांनी तातडीचे अर्ज दाखल केले आहे. या वेळी, बहुतांश पालकांनी अर्जासोबत हॉलिडे पॅकेज, सहलींचे बुकिंग्ज तसेच दिवाळी कार्यक्रमाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करून मुलांचा ताबा मिळण्याची मागणी केली आहे. कौटुंबिक अडचणींमुळे भेट दुर्मीळ झालेल्या चिमुकल्यांसोबत सर्वात मोठा दिवाळीचा सण त्यांच्यासोबतच साजरा करायचा ही त्यामागील भावना असल्याचे कौटुंबिक न्यायालयातील ॲड. संग््रााम जाधव यांनी सांगितले.
न्यायालयाला दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी कुटुंबातील व्यक्तीला जामीन तसेच पॅरोल मिळण्याकडे कुटुंबीयांचा कल आहे. तो मंजूर झाल्यास त्यांना आनंदाने कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा सण साजरा करता येईल. न्यायालयही मानवतेच्या दृष्टिकोनातून जामीनपात्र व्यक्तींना जामीन मिळावा यासाठी आग््राही असल्याने कैदी आनंदी आहेत.
ॲड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील
न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त असून, त्यामधून न्यायालयही प्रलंबित जामीनांच्या प्रकरणांना न्याय देत आहे, ही समाधानाची बाब आहे. दिवाळीसाठी आपला माणूस घरी असावा या उद्देशाने कैद्यांच्या कुटुंबीयांकडून जामीन तसेच पॅरोलबाबत विचारणा होत आहे. त्याअनुषंगाने कायदेशीर प्रक्रियाही न्यायालयात करण्यात येत आहे.
ॲड. अभिजित पोळ, फौजदारी वकील