नारायणगाव: पिंपळगाव जोगा(ता.जुन्नर)येथील भोईरवाडी येथे भाताची कापणी करीत असलेल्या महिलेला ठार करणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात वन विभागाला २४ तासाच्या आत यश आले आहे.
ज्या ठिकाणी महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या पहाटे जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व चैतन्य कांबळे यांनी दिली. दरम्यान त्या ठिकाणी अद्यापही एक बिबट्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असल्याने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत.
दरम्यान २४ तासाचे आत वन खात्याने त्या नरभक्षक बिबट्याला पकडावे या मागणीसाठी सुरज वाजगे यांनी भोईर कुटुंबाच्या घरी मुक्काम केला होता. या परिसरामध्ये बिबट्याने हैदोस घातल्याने वन खात्याने अधिक सतर्क रहावे व पकडलेल्या बिबट्याला गोळ्या घालाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांची असून बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या भिमाबाई भोईर यांच्या अंत्यविधी वेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वनखात्याच्या विरोधात आक्रोश केला होता.
अनेकदा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केल्यावर स्थानिकांना पिंजरा आणायला सांगतात एवढेच नाही तर त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला खाद्य म्हणून शेळी अथवा कोंबडी ठेवण्यास स्थानिक लोकांना सांगतात अशी तक्रार या लोकांची आहे.
दरम्यान विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर भोईर कुटुंबाची आज भेट घेणार आहेत तसेच बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासंदर्भात देखील वनविभागाशी संवाद साधणार असल्याची माहिती विकास राऊत यांनी दिली.