सुरेश वाणी
नारायणगाव : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेडसह शिरूर तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहे. या भागात बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे येथे गळीत हंगामासाठी दाखल झालेल्या कोपीत किंवा उघड्यावर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Latest Pune News)
आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी येथे मराठवड्यासह इतर ठिकाणांहून ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलेही आहेत. ते कॉप्या करून राहतात. त्यांच्या बाजूने उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी तारेचे कंपाउंड करून झटका मशीन बसवण्यात यावी, अशी मागणी आता ऊसतोडणी मजुरांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे वन खात्याला, साखर कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांसाठी आता ही नवीन जबाबदारी घ्यावी लागणार आहे. हंगामासाठी सर्व साखर कारखाने विभागवार ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या उतरवत आहेत. त्या ठिकाणी तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व वीजेची व्यवस्था केली जाते. परंतु, या मजुरांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे त्यांना उघड्यावरच जावे लागते. तसेच भल्या पहाटे ऊस तोडणीसाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथील काकडपट्टी या ठिकाणी तीन बिबट्याने ऊसतोडणी मजुराच्या बैलावर हल्ला करून ठार केले आहे. बिबट्याचा हल्ला पाळीव प्राण्यावर झाल्यामुळे ऊसतोडणी मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी त्यांचा अड्डा तेथून दुसरीकडे हलवलेला आहे. परंतु, त्या कोपादेखील उघड्यावरच आहेत. त्यामुळे तेथेही बिबट्याचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.