

पुणे : देशात सहा लाख गावे असूनही केवळ एक लाखाहून अधिक विकास सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. ही संख्या वाढविण्याची संधी जरी देशात उपलब्ध असली तरी पारंपरिक पीक कर्जाचा व्यवसाय सोडून विविध व्यवसाय अंगीकारण्याची गरज आहे. नाहीतर विकास सोसायट्यांचे भवितव्य धोक्यात असल्याबाबतची चिंता नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुबमण्यम यांनी येथे व्यक्त केली. पीक कर्जाव्यतिरिक्त जनऔषधी केंद्रे, कॉमन सर्व्हिस सेंटर, पेट्रोलपंप, चार्जिंग स्टेशन, कृषी निविष्ठा केंद्रे, कृषी प्रक्रिया क्षेत्रात सहभाग घेतल्यास सोसायट्या नक्कीच फायद्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Latest Pune News)
येथील यवैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेतय (व्हॅम्नीकॉम) केंद्र सरकारचा नीती आयोग, नाबार्ड आणि राज्याच्या सहकार आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशात कृषी मूल्य साखळी विकास आणि ग्रामीण समृद्धीचे इंजिन म्हणून प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) तथा विकास सोसायट्या मजबूत करणे या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रा. रमेश चंद, आयोगाच्या प्रोग्राम डायरेक्टर राका सक्सेना, आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. बबीता सिंग, नाबार्डचे उपमहासंचालक गोवर्धन सिंग रावत, राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, व्हॅम्नीकॉमचे संचालक डॉ. सुवाकांता मोहंती आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई आणि सहकार आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. देशातील विकास सोसायट्या, बँका व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. विकास सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी ठोस धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार आहे.
नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रा. रमेश चंद म्हणाले की, भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याला आपल्या कामाची दिशा बदलावी लागेल आणि त्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. कृषी सहकारी संस्थांनी डिजिटल व्यवहार, शेतीतील तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहचून मालविक्री ही मूल्यसाखळी भागीदारीद्वारे वाढवायला हवी, तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आपण वाढ करू शकतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणून राष्ट्रीय उत्पन्नातील शेती व शेतकऱ्यांचा वाटा वाढवू शकतो. ज्याद्वारे दरडोई उत्पन्न वाढीसही मदत होईल. शंतून घोष यांनी प्रास्तविक तर डॉ. बबीता सिंग यांनी आभार मानले.
कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना प्रा. रमेश चंद. डावीकडून दीपक तावरे, गोवर्धनसिंग रावत, बी. व्ही. आर. सुबमण्यम.
देशातील विकास सोसायट्या (पॅक्स) या अनिष्ट तफावतीमध्ये (इन बॅलन्स फिगर) जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अशी स्थिती गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातही आहे. केंद्राने अनिष्ट तफावत दूर करण्यासाठी मदतीची गरज आहे.
दीपक तावरे, सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य