

कात्रज : कात्रज चौकात पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण, ठिकठिकाणी केले जाणारे वाहनांचे अनधिकृत पार्किंग आणि पीएमपीच्या काही बेशिस्त बसचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने गेल्या दोन दिवस सडेतोड वृत्तांकन करीत जनसामान्यांच्या आवाजाला वाचा फोडली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने धडक कारवाई करीत चौकातील वाहतुकीचा श्वास मोकळा केला आहे. परंतु, हे चित्र केवळ एका दिवसापुरते नको, तर प्रशासनाने नियमित कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.(Latest Pune News)
कात्रज चौकात परिसरात पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारीस अडथळा होत होता. तसेच पीएमपीच्या बस रस्त्याच्या मध्यभागातून वळविल्या जात होत्या. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारे खासगी वाहनांसह रिक्षाचालकांनी वाटेल तिथे अनधिकृत थांबे तयार केले होते. यामुळे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने मंगळवारी (दि.28) ‘कात्रज चौकात अतिक्रमणांचा ‘बाजार’ आणि बुधवारी (दि.29) ‘कात्रज चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस आणि पीएमपी प्रशासनाने अखेर कारवाई सुरू केली आहे.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने कात्रज चौकातील पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे हाटविण्यात आली आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार बरडे यांच्या नियंत्रणाखाली परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच काही अनधिकृत रिक्षा थांबेही हटविण्यात आले.
दै.‘पुढारी’च्या वृत्ताकनानंतर प्रशासन हाले असून, धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आल्याने कात्रज चौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, ही कारवाई केवळ एक, दोन दिवसांपूरती मर्यादित न ठेवता कात्रज चौक कायमचा अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कात्रच चौकातील अतिक्रमणे, वाहतूक कोंडीबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि प्रशासनाकडून कारवाई सुरू होते. मात्र, काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत आहे. गेल्या काळात या ठिकाणी अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळीही गेले आहे. प्रशासनाने परिसर अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
अमित पांडे, रहिवासी, कात्रज
पीएमपी कात्रज आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र गाजरे यांनी परिपत्रक काढून बसचालकांना सूचना दिल्या. तसेच कात्रज चौकात सकाळी आणि दुपारच्या सत्रात दोन कर्मचारी नियुक्ती करून बस मुख्य चौकातून न वळवता गुजरवाडी फाटा परिसरातील पीएमपी स्थानक आणि पार्किंगमधून वळविण्यात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू होण्यास मदत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.