

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची लूटमार करणाऱ्या एका दुकानदाराला मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मोठा दणका दिला आहे. एका दुकानदाराने 14 रुपयांची ‘रेलनीर’ पाण्याची बाटली एका प्रवाशाला 20 रुपयांना विकल्यावरून रेल्वे पुणे विभाग प्रशासनाने त्याला 20 हजारांचा दंड केला अन् त्याचे दुकान दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.(Latest Pune News)
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील एका विक्रेत्याने रेलनीर ही पाण्याची बाटली, जिची किंमत 14 रुपये आहे, ती बाटली एका प्रवाशाला 20 रुपयांना विकली. म्हणजेच, त्याने 06 रुपये अतिरिक्त घेऊन प्रवाशाची लूट केली. या प्रकाराची तक्रार एका जागरूक प्रवाशाने रेल्वेच्या मदतीसाठी असलेल्या 139 या क्रमांकावर केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, रेल्वे पुणे विभाग प्रशासनाने तत्काळ कारवाई केली अन् त्याला दंड ठोठावला, त्याचबरोबर दोन दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला होता.
आम्हाला 139 क्रमांकावर एका प्रवाशाने विक्रेत्याकडून केलेल्या लुटीबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही तत्काळ पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील विक्रेता ए. एच. व्हीलर याला 20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, त्याचे दुकान दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.
हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे