ई-केवायसीत अडथळे; लाडक्या बहिणी वैतागल्या Pudhari
पुणे

Ladki Bahin Yojana eKYC: ई-केवायसीत अडथळे; लाडक्या बहिणी वैतागल्या

ओटीपी न येणे, वेबसाइट न उघडणे यामुळे महिलांची गैरसोय; प्रशासनाकडे सुलभ आणि सुरक्षित प्रणालीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बारामती : राज्य सरकारची ‌‘लाडकी बहीण योजना‌’ महिलांना आर्थिक आधार देत आहे. परंतु, बारामती तालुक्यातील अनेक महिलांना योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ओटीपी न येणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येत नसल्याने प्रक्रिया थांबते. आधार क्रमांकाचा गोंधळ सुरू आहे.(Latest Pune News)

ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जातो; पण ज्या महिला विधवा आहेत किंवा वडील हयात नाहीत, त्यामुळे पुढे कसे जायचे? असा गोंधळ उडाला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला असला, तरी केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांना त्रास होत आहे.

यापूर्वी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे निधीवितरणात विलंब झाला होता. मात्र, आता सामाजिक न्याय विभागाने 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याने 11 ऑक्टोबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र, आगामी महिन्यापासून ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केल्याने अनेक महिलांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. बारामती तालुक्यासह शहरातील सर्वच महा-ई-सेवा केंद्रांवर महिला आणि घरातील पुरुषमंडळी ई-केवायसीसाठी गर्दी करीत आहेत.

वेबसाइट उघडत नाही, ओटीपी येत नाही. परिणामी, तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी येत आहेत. अधिकृत वेबसाइट अनेकदा उघडत नाही, ‌’एरर‌’ दाखवते. अनेक महिलांना आधाराशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येत नसल्याने पुढील प्रक्रिया थांबत आहे.

फेक वेबसाइट्‌‍समुळे महिलांची दिशाभूल

शासनाने ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन केले आहे. परंतु, ग्रामीण भागात तितकी जनजागृती नाही. ई-केवायसीसाठी महिला गुगलवर वेबसाइट शोधतात. त्यात अनेक बनावट वेबसाइट आढळून येतात. तेथे माहिती भरली गेल्यास व्यक्तिगत माहितीसह नुकसानीची शक्यता आहे. केवायसी करताना फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावरच माहिती भरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सुलभ आणि सुरक्षित प्रणालीची अंमलबजावणी करा

बारामती तालुक्यातील महिलांसाठी ‌‘लाडकी बहीण योजना‌’ ही खऱ्या अर्थाने आधार ठरली आहे. मात्र, ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थींची गैरसोय होत आहे. शासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवून ग्रामीण महिलांसाठी सोप्या, सुलभ आणि सुरक्षित केवायसी प्रणालीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT