पुणे

जागतिक हिपॅटायटीस दिन : हिपॅटायटीस आजाराविषयी जागरूकतेचा अभाव

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हिपॅटायटीस (यकृतदाह) या संसर्गजन्य आजाराविषयी सध्या जागरूकतेचा अभाव पाहण्यास मिळत आहे. शहरामध्ये सद्यःस्थितीत हिपॅटायटीस या आजाराचे रुग्ण नियंत्रणात आहेत. या आजाराच्या रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब झाल्यास ती बाब प्राणघातक ठरू शकते. एक ते दोन टक्के रुग्णांमध्ये हिपॅटायटीस बीचे प्रमाण आढळते. तर, हिपॅटायटीस सीचे प्रमाण हे 0.5 ते 1 टक्के रुग्णांमध्ये आढळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे.

आजाराचे दुष्परिणाम

या आजारामुळे जलोदर व त्याचे दुष्परिणाम, रक्ताच्या उलट्या, बेशुद्धावस्था तसेच वेळप्रसंगी मृत्यू संभवतो. आजाराची लागण झालेल्या रुग्णाला यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता देखील बळावते.

आजार पूर्ण बरा होणे शक्य

हिपॅटायटीस ए या आजारासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. हिपॅटायटीस ए आणि ई हे आजार व्यापक प्रमाणात पसरतात आणि कधी कधी तीव्र प्राणघातक होऊ शकतात. परंतु रुग्ण आजारातून बरा झाल्यास यकृत मूळ पदावर येते. हिपॅटायटीस ई हा आजार गरोदरपणात होणे धोकादायक असते. यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याचीही भीती असते. सुदैवाने हिपॅटायटीस बी विरुद्ध अतिशय प्रभावी लस उपलब्ध आहे. हिपॅटायटीस सीच्या विरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. पण हा आजार तीन महिन्यांच्या औषधोपचारांनी पूर्णपणे बरा होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

हिपॅटायटीस म्हणजे काय?

हिपॅटायटीस (यकृतदाह) हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे ए, बी, सी, डी आणि ई अशा पाच प्रकारांत वर्गीकरण केले गेले आहे. ए आणि ई या दोन विषाणूंमुळे होणारा यकृतदाह प्रामुख्याने दूषित पाणी व अन्न यामुळे होतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आवश्यक आहे.

हिपॅटायटीसची लक्षणे :

ताप, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अशक्तपणा, लघवी पिवळसर होणे, पोटदुखी, संपूर्ण शरीरावर खाज सुटणे अशी विविध लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.

विषाणू कसे पसरतात ?

हिपॅटायटीस बी व सी या आजाराचे विषाणू प्रामुख्याने दूषित रक्त किंवा रक्तघटक, शस्त्रक्रिया, गोंदवून घेणे, दूषित सुईने अंमली पदार्थ टोचून घेणे या मार्गाने पसरतात. आईकडून नवजात बालकांना संसर्ग, एकाहून जास्त व्यक्तींशी लैंगिक संबंध, जवळच्या संपर्कातील व्यक्तीला संसर्ग होणे आदी मार्गांनीही हा आजार पसरतो. हिपॅटायटीस बी व सी हे सामान्यत: अक्यूट स्टेजमध्ये होत नाहीत. हे दोन्ही विषाणू नकळत शरीरात प्रवेश करतात व कित्येक वर्षे डॉरमंट राहतात. यामुळे यकृताचे कायमस्वरूपी नुकसान होते. हिपॅटायटीस हा आजार गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये घातक असू शकतो. त्यामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

काय काळजी घ्याल ?

  • रक्त घेताना ते तपासलेलेच आहे का, हे पाहावे.
  • पावसाळ्यात फ्रिजमधले पदार्थ खाऊ नये.
  • सॅलेड किंवा कच्च्या पालेभाज्या न धुता खाऊ नये.
  • जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
  • पुरेशी वैयक्तिक स्वच्छता राखावी.
  • उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
  • पाणी निर्जंतुक करून प्यावे.

एक ते दोन टक्के रुग्णांमध्ये हिपॅटायटीस बी चे प्रमाण आढळते. तर, हिपॅटायटीस सीचे लागण झालेले अर्धा ते 1 टक्के रुग्ण आढळतात. हिपॅटायटीस ए आणि ई पुर्णपणे बरा होऊ शकतो. हिपॅटायटीस बी आणि सी वर देखील औषधे उपलब्ध आहेत. या आजारासाठी दीर्घकालीन उपचार करावे लागतात. हेपॅटायटीस बी झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. हिपॅटायटीस बी आणि सी झालेल्या रुग्णांनी वर्षातून एकदा सोनोग्राफी करावी. म्हणजे त्यांना कर्करोग तर झाला नाही ना, हे स्पष्ट होऊ शकते.

– डॉ. सायली तळपुळे,
एम. डी., मेडिसीन

हिपॅटायटीस या आजाराच्या महापालिका रुग्णालयांमध्ये सद्यःस्थितीत रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. या आजारावर आवश्यक औषधे महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिलेली आहेत. या आजाराचे रुग्ण वाढल्यास त्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपचार महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

– डॉ. लक्ष्मण गोफणे,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT