पुणे

Kurkumbh Drugs Case : सरकारी अधिकार्‍यांसाठी पाकीट संस्कृती

Laxman Dhenge

कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक क्षेत्रातील काही रासायनिक कारखान्यातील चुकीच्या कामांना पाठीशी घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ अधिकार्‍यासाठी विशेष पाकीट संस्कृती वापरली जाते. या पाकीट संस्कृतीमुळे कुरकुंभ आणि पांढरेवाडी गावाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र रासायनिक झोन असून, या ठिकाणी 80 ते 100 पेक्षा जास्त लहान व मोठे कारखाने आहेत. आग लागणे, स्फोट होणे, रसायनमिश्रित दूषित सांडपाणी प्रदूषण व इतर प्रदूषणच्या गंभीर समस्या आहेत. प्रदूषणामुळे जमिनीचे, शेतीचे नुकसान झाले आहे.

रासायनिक झोनमुळे कारखान्यांसाठी नियम, अटी कडक आहेत. मात्र, कारखान्यांचे अधिकार्‍याशी लागेबांधे असल्याने बहुतांश कारखाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून कारभार करतात. कारखान्यात ज्या पदार्थाचे उत्पादन घेतले जाते. याबाबतची सर्व सविस्तर माहितीचे फलक कारखान्याबाहेर लावणे गरजेचे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तक्रार असेल, तरच संबंधित कारखान्याला भेट देतात. ते ही कधी येतात कधी जातात याचा पत्ता लागत नाही. कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने असल्याने प्रत्येक कारखान्यास भेट देऊन पाहणी करणे टाळले जाते. त्यामुळे कंपन्याची पाहणीचा अहवाल पाकिटाच्या वजनावर अवलंबून असतो. कारखान्याचे प्रदूषण, सांडपाण्याचा गंभीर प्रश्न, अपघात, आग, स्फोट, नियम मोडून केला जाणारा कारभार, परवाना एक उत्पादन दुसरे, परवाना नसताना उत्पादन घेणे.

याबरोबर कारखान्याचा व्यवस्थित कारभार चालू असल्याचे दाखविण्यासाठी पाकिटाची संस्कृती वापरली जाते. कारखान्याला लागणारे पाणी व वापरानंतर शिल्लक राहिलेले सांडपाणी किती प्रमाणात दूषित झाले आहे. यावर पाकिटाचे वजन ठरविले जाते. नागरिकांची तक्रार असेल, तर त्यावर सौम्य कारवाईसाठी वेगळ्या वजनाचे पाकीट ठरविले जाते. ग्रामपंचायतीची तक्रार असल्यास जास्त गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाची कारखान्यांना अजिबात भीती राहिली नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT