एक्स्प्रेस थांब्याकरीता भिगवणला रास्ता रोको | पुढारी

एक्स्प्रेस थांब्याकरीता भिगवणला रास्ता रोको

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील भिगवणला एक्सप्रेस रेल गाड्यांचा थांबा पुर्ववत व्हावा या मागणीसाठी प्रवाशी संघटना व शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी भिगवण रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन केले. एक्सप्रेस रेल्वे थांबा घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.आंदोलनात भिगवणसह राजेगाव,तक्रारवाडी, डीकसळ, मदनवाडीआदी गावातील रेल्वे प्रवाशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की,भिगवण रेल्वे स्टेशन येथे कोरोना संसर्गजन्य रोगापूर्वी हैदराबाद-मुंबई, चेन्नई-मुंबई, कोणार्क,हुतात्मा, पुणे-बंगरुल आदी एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा होता.या ठिकाणाहून या भागातील नोकरदार,कामगार,विद्यार्थी, प्रवाशी यांची मोठी रेलचेल होती.परंतु कोरोना काळापासून या रेल्वेचा थांब बंद झाला. त्यानंतर सर्व व्यवस्था पूर्ववत आल्या तरी रेल्वेचा थांबा मात्र पूर्ववत झाला नाही.याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे प्रशासनाला याबाबत निवेदने सादर करण्यात आले. परंतु त्याचा कसलाही आजवर विचार झाला नाही.

यावरून संतापलेल्या प्रवाशी व नागरिकांनी मंगळवारी रेल रोको आंदोलन केले. यावेळी माजी उपसभापती पराग जाधव,सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, माऊली लोंढे, तानाजी वायसे,तुषार क्षीरसागर,जावेद शेख,सत्यवान भोसले,तेजस देवकाते,अभिमन्यु खटके, आदीजण सहभागी झाले होते. येथील स्टेशन मास्तारांना निवेदन देण्यात आले.निवेदन व रास्ता रोकोची व लोकभावनांची माहिती वरिष्ठ पातळीवर तत्काळ कळवू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

थांबा पुर्ववत होईल अपेक्षा

नागरिकांची,प्रवाशांची, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे थांबा पूर्ववत होण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनालाही वारंवार रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची वेळ आली. यामुळे रेल्वे थांबा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया सरपंच दिपीका क्षीरसागर व उपसरपंच मुमताज शेख यांनी यावेळी दिली.

प्रवाश्यांचे हाल व रोजगारावर गदा:जाधव

बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव म्हणले की,भिगवण स्टेशन हे तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असुन, रेल्वेचा थांबा बंद झाल्यापासून पंचवीस तीस गावातील प्रवाश्यांचे हाल सुरू आहेत,शिवाय रोजगार हिरावला आहे.थांबा पूर्ववत न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल.

हेही वाचा

Back to top button