ठाणे : पुढारी वृत्तसेवा : तुमच्या नावाने विदेशात जात असलेले पार्सल कस्टम विभागाने पकडले आहे. या पार्सल मध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. अशी बतावणी करीत अज्ञात भामट्यांनी 64 वर्षीय व्यक्तीला तब्बल 11 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या आशर रेसिडेन्सी येथे राहणारे 64 वर्षीय तक्रारदार यांना 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी एका मोबाईल क्रमांकावरून अज्ञात इसमाने फोन केला. कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगत फोन करणार्या व्यक्तीने तुमच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठवण्यात आले असून त्यात बेकायदेशीर वस्तू आहेत.
हे पार्सल आमच्याकडे आले आहे व ते पुढील कारवाईसाठी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत आहे असे सांगितले. त्यानंतर फोनवरून बोलणार्या व्यक्तीने आम्ही फोन मुंबई गुन्हे शाखा, अंधेरी पूर्व येथे ट्रान्सफर करतोय असा बनाव करून तक्रारदार यांना धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार यांना 11 लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास भाग पाडले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठ नागरिकाने या प्रकरणी चितळसर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.