Audit Pudhari
पुणे

Kothrud Development Works: कोथरूडमधील विकासकामांवर अनियमिततेचे आरोप; विशेष लेखापरीक्षणाची राष्ट्रवादी नगरसेवकांची मागणी

आमदार स्थानिक विकास निधीतून चार जलतरण तलावांतील यूव्ही प्रणालीवर ३८ लाखांचा खर्च; निविदा, कामाची गुणवत्ता आणि बिलांची चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच अन्य विकास निधीतून महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. या कामांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) तसेच आवश्यकतेनुसार थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्यात यावे, असा प्रस्ताव स्थायी समितीत देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचे राज्यातील उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील विकासकामांचीच चौकशी करण्याची मागणी झाल्याने स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या चार जलतरण तलावांमध्ये युव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. कै. बलभीम कोकाटे जलतरण तलाव, कै. धनंजय ताम्हाणे जलतरण तलाव (बाणेर), नथुजी मेंगडे जलतरण तलाव (कर्वेनगर) आणि स्वामी विवेकानंद जलतरण तलाव (बावधन) येथे ही कामे करण्यात आली आहेत.

प्रत्येक कामासाठी ९ लाख ५३ हजार ९०० रुपये, याप्रमाणे एकूण ३८ लाख १५ हजार ६०० रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या कामांच्या चौकशीदरम्यान प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाज पत्रके, निविदा प्रक्रिया, कंत्राटवाटप, प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि प्रमाण यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच मंजूर आराखड्याशी प्रत्यक्ष काम सुसंगत आहे की नाही, याचीही पडताळणी करण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मोजमाप पुस्तिका, बिले, कार्यादेश, संबंधित देयकांचीही सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT