पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.31) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्कातील लिबर्टी सोसायटीत सुरू असलेल्या अवैध नववर्षारंभ मद्य पार्टीवर छापा टाकला. या वेळी पार्टी आयोजकासह 71 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये 9 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
ओम रवींद्र भापकर (वय 22, रा. खराडी) याने ही अवैध पार्टी आयोजित केली होती. त्याला उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. पार्टीच्या ठिकाणाहून 15 हजार 500 रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि बिअरचा साठा जप्त केला आहे. तसेच फिज, साऊंड सिस्टीम असे 33 हजार 500 रुपयांचे साहित्य जप्त केले. पार्टीत पुण्यासह बाहेरच्या राज्यातील तरुण- तरुणींचा देखील समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ए विभागाला कोरेगाव पार्कमधील लिबर्टी सोसायटीतील ए बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील दहाव्या सदनिकेत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य पार्टीचे आयोजन केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने सदनिकेवर छापा टाकला. त्यावेळी 71 तरुण-तरुणी पार्टीत सहभागी झाल्याचे आढळून आले. या पार्टीचे आयोजन ओम भापकरने केले होते. नियमांचे उल्लंघन करत भापकरने सोशल मीडियावर जाहिरात करून तरुण-तरुणींना आकर्षित केले होते. पार्टीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला 800 रुपयांचे शुल्क आकारले होते. भापकरने सदनिका भाड्याने उपलब्ध करून देणाऱ्या एका एजन्सीच्या माध्यमातून घेतली होती. पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी ससून रुग्णालयात करण्यात आली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात विमानतळ परिसरातील द नॉयर पबमध्ये सुरू असलेल्या अवैध मद्य पार्टीवर छापा टाकून अधीक्षक कानडे यांच्या पथकाने कारवाई केली होती. या वेळी 52 जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पबचालक अमरजित सिंग संधू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वसंत कौसडीकर, पी. आर. पाटील, देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक रोहित माने, हितेश पवार, स्वप्निल कदम, दिनेश सूर्यवंशी, प्रियांका कारंडे, जवान श्रीधर टाकळकर, पूजा किरतकुडवे, जान्हवी शेडगे, सौरभ गोसावी यांच्या पथकाने केली.
नऊ अल्पवयीन मुलांचा पार्टीत सहभाग
पोर्श प्रकरणानंतर शहरात अल्पवयीन मुलांचा पबप्रवेश आणि मद्य विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व रेस्टॉरंट बार, पब आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना स्पष्ट निर्देश दिले होते. दरम्यान, कोरेगाव पार्कातील या अवैध मद्य पार्टीत 9 अल्पवयीन मुले सहभागी झाल्याचे आढळून आले आहे.
कोरेगाव पार्कमधील लिबर्टी सोसायटीतील एका सदनिकेत ही अवैध मद्य पार्टी सुरू होती. कारवाईत पार्टी आयोजकासह 71 तरुण-तरुणींवर कारवाई केली आहे. पार्टीत काही अल्पवयीन मुलेदेखील मिळून आली आहेत. गेल्या आठवड्यात विमानतळ परिसरातील द नॉयर पबवर देखील अशीच कारवाई केली होती.अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे