

पुणे/हडपसर: हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मधील तब्बल आठ अपक्षांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात न्यायालयीन दाद मागणार असल्याची भूमिका इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 31 डिसेंबर 2025 रोजी दस्तऐवज पडताळणीची अधिकृत वेळ सकाळी 11:00 ते दुपारी 3:30 अशी असताना एससी (अनुसूचित जाती) प्रवर्गातील महिला उमेदवार वेळेत क्षेत्रीय कार्यालयात पोहचल्या होत्या. या अपक्ष महिला उमेदवारांमध्ये कोमल लक्ष्मण भोसले, प्राची पीतांबर धिवार, रूपाली कांबळे, दिशा पवार, आशा आदमाने, शुभांगी आरणे, श्रावणी आवडे आणि रवींद्र टिंगरे या उमेदवारांचा समावेश आहे.
फक्त एसी प्रवर्गातील महिलांनाच जाणूनबुजून आत प्रवेश नाकारण्यात आला. आमच्यानंतर आलेल्या इतर सर्व उमेदवारांना कार्यालयात प्रवेश देऊन त्यांची दस्तऐवज पडताळणी करण्यात आली. मात्र, आम्हाला आतमध्ये घेण्यात आले नाही. आमची सर्व कागदपत्रे पूर्ण व अचूक असूनही, आम्हाला संपूर्ण दिवस बाहेरच थांबविण्यात आले. आम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत तेथे उपस्थित होतो. शेवटी कोणतीही लेखी नोटीस न देता आम्हाला ‘तुमचा फॉर्म रद्द झाला आहे,’ असे सांगण्यात आल्याचे उमेदवार कोमल लक्ष्मण भोसले यांनी या वेळी सांगितले.
प्राची धिवार म्हणाल्या की, ही कृती अत्यंत अन्यायकारक असून, एससी प्रवर्गातील महिलांशी झालेला भेदभाव व मानसिक छळ आहे. आम्ही अधिकृत वेळेत उपस्थित असतानाही दस्तऐवज पडताळणी नाकारणे हे निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे. आमच्या दस्तऐवजांची पडताळणी करून घ्यावी आणि आम्हाला चिन्ह वाटप प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी द्यावी. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य चौकशी करावी; अन्यथा आम्ही न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रत्येक इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर करताना प्रत्येक वेळी छाननीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे सांगितले होते. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराकडे लेखी नियमसुद्धा आहेत. छाननीची दहा तास प्रक्रिया सुरू होती. परंतु, सकाळी 11 वाजता संबंधित आठ अपक्ष उमेदवार वेळेत उपस्थित राहिले नाहीत. त्यांचा अर्ज बाद केल्याची नियमाप्रमाणे त्यांच्याकडे ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया नियमातच केली आहे.
गणेश मारकड, निवडणूक निर्णय अधिकारी