तरुणीच्या खून प्रकरणाचा उलगडा Pudhari
पुणे

Murder Case: तरुणीच्या खून प्रकरणाचा उलगडा; उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं

कोरेगाव मूळ हत्याकांडाचा तपास ‘पुढारी’च्या वृत्तानंतर वेगात; पोलिसांनी बुटाच्या पुराव्यावरून आरोपीचा शोध घेतला

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: स्त्रीसुखाच्या विकृत मानसिकतेपोटी 20 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करताना या तरुणीने नकार देताच चिडलेल्या नराधमाने मुलीच्या डोक्यात तीन वेळा दगड घालून तिचा निर्घृण खून केल्याचा प्रकार अखेर उरुळी कांचन पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथे निर्जनस्थळी नराधमाने केलेल्या कृत्याचा पोलिसांनी आरोपीने घातलेल्या बुटावरून शोध घेऊन खुनाचा उलगडा केला आहे. (Latest Pune News)

दिनेश संजय पाटोळे (रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पूनम विनोद ठाकूर (वय 20, रा. गगन आकांक्षा सोसायटी कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन कोरेगाव मुळ ग््राामपंचायत हद्दीत प्रयागधाम रस्त्यावर 14 ऑक्टोबर रोजी

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खासगी नोकरीवरून घरी परतणाऱ्या पूनमला पीएमपीएमएल बसमधून उतरताच निर्जनस्थळ पाहून आरोपी दिनेश पाटोळेने गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पूनमने आरडाओरडा केल्याने भयभीत झालेल्या आरोपी दिनेश पाटोळेने पूनमवर तीन वेळा डोक्यात दगड घालून या प्रसंगाची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल संवादावरून खुनाचा कसून तपास केला, मात्र काळोखाचा फायदा व दुचाकी मोटरसायकल दुसऱ्या दिशेने उभी करून आरोपीने खुनाचा संशय उत्पन्न होऊ नये अशा शिताफीने खून केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे बुटाचे नमुने तपासून केलेल्या तपासकार्यात तपास पथकांनी घटनास्थळापासूनच्या रस्त्यावरील सुमारे 60 -70 सीसीटीव्ही कॅमेरे, मयत मुलीच्या संपर्कातील तसेच परिसरातील सुमारे 200 ते 250 व्यक्तींकडे तपास केला व बुटाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे. पोलिसांनी दिनेश पाटोळे याला प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि. 27) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, ईश्वर जाधव, गुन्हे शाखेचे अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, धीरज जाधव, भारत मोहोळ, रमेश भोसले, सुनील सस्ते, अजित काळे, कमलेश होले, विशाल रासकर, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, प्रवीण चौधर, नीलेश जाधव, सचिन जगताप, हरिश शितोळे, सुजाता भुजबळ, सावित्रा सांगडे, सुमित वाघ, दीपक यादव, सोमनाथ सुपेकर, सुवर्णा गायकवाड, ऋषीकेश रासकर, अश्वजीत मोहोड, अमोल खांडेकर, अमोल राऊत, राजकुमार भिसे यांनी केली असून पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.

दै. ‌‘पुढारी‌’च्या सडेतोड वृत्ताने प्रशासनाला जाग

पूनम ठाकूर या गरीब तरुणीचा निर्घृण खून झाल्यानंतर या खून प्रकरणाच्या तपासात उलगडा होण्यास उशिर होत असल्याने दै. ‌‘पुढारी‌’ने दि.20 रोजीच्या अंकात या खूनप्रकरणी सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलिस प्रशासनाला जाग येईल व गरीब कुटुंबीयाच्या मदतीला विरोधी पक्ष, सामाजिक संघटना व मानव अधिकार संघटना न्याय देण्यासाठी पुढे येत नसल्याचे परखड वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर सुस्त यंत्रणा कामाला लागून पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी तपासाची सूत्रे अधिक बळकट करून आरोपीला गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT