कोंढवा बुद्रुक-येवलेवाडीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी Pudhari
पुणे

Kondhwa Yeolewadi PMC Elections: कोंढवा बुद्रुक-येवलेवाडीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी; महायुतीला महाविकास आघाडीकडून कडवे आव्हान

प्रभाग क्रमांक 40 मध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीच्या उमेदवारांची चढाओढ; स्थानिक नेतृत्वातील स्पर्धेमुळे लढत अधिक रंगतदार

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 40 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी

कोंढवा बुद्रुकची महसुली हद्द आणि काही कात्रज महसुली हद्द मिळून तयार झालेल्या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागामध्ये (क्र. 40) विविध समाजघटक, झोपडपट्टीपासून उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत सर्वच स्तरांचा समावेश आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा हा प्रभाग आता नव्या राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील थेट लढतीचे रणांगण ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.(Latest Pune News)

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत जुन्या प्रभाग 41 मध्ये भाजपच्या रंजना टिळेकर, वीरसेन जगताप, वृषाली कामठे हे तीन नगरसेवक निवडून आले होते. तर, एकत्रित शिवसेनेच्या संगीता ठोसर निवडून आल्या होत्या. मात्र, ठोसर ह्या भाजपात गेल्याने चारही नगरसेवक भाजपचे आहेत. त्यातच 2017 च्या निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेल्या भाजपच्या सुवर्णा मारकड यांचे दीर सतीश मारकड हे प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य होते.

2017 च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेतलेल्या तुषार कदम यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यांची प्रभाग समिती सदस्यपदी निवड केली होती. तेही प्रमुख दावेदार मानले जातात. त्यामुळे हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या प्रभागातूनच माजी नगरसेवकांसह प्रभाग समिती सदस्य आणि इतर असे किमान डझनभर इच्छुक तिकिटासाठी रांगेत असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी भाजपमध्ये उमेदवारीसाठी माजी नगरसेवकांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत अंतर्गत स्पर्धा लागली आहे. त्यामुळे या प्रभागातील आगामी निवडणूक ‌‘घरचा लढा की, विरोधकांशी सामना‌’ या दोन टोकांच्या समीकरणांमध्ये अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या प्रभागात भाजपचे विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर हे प्रमुख चेहरा असून, पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार, हे निश्चित आहे. त्यामुळे माजी नगरसेवक, स्वीकृत सदस्य, ताकदीचे कार्यकर्ते यापैकी तिकीट कोणाला मिळते आणि कोण नाराज होतो, यावरच लढतीचे समीकरण अवलंबून राहील. हा प्रभाग हडपसर विधानसभा मतदारसंघात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. याच प्रभागातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. नुकतेच जनसंवाद व राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याने या प्रभागातील राजकीय वातावरणात सकारात्मक हालचाल आणि नवे समीकरण निर्माण झाले आहे. या भागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि वाहतूक कोंडीसारख्या स्थानिक समस्यांवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. त्याच वेळी स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले. या भेटीनंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधीर डावखर, संदीप बधे, उदयसिंह मुळीक व रोहन कामठे हे इच्छुक आहेत.

2017 च्या निवडणुकीत शिवसेनेतून लढलेले माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर बधे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. ते स्वतःचे पॅनेल उभे करून स्थानिक कार्यकर्ते व समाजघटकांना सोबत घेऊन लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या प्रभागातील मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हेमंत बधे, रोहित साळवे, बाळा कवडे, काँग्रेसकडून अमोल धर्मावत इच्छुक आहेत. महाविकास आघाडी होणार की स्वबळावर लढणार, हे पाहावे लागणार आहे.

विकासकामांचा हिशेब अन्‌‍ स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा

आघाडीचे गणित अनिश्चित असल्याने सद्यःस्थितीत महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) या प्रभागात फारशी प्रभावी हालचाल करताना दिसत नाही. मात्र, येणाऱ्या काळात स्थानिक पातळीवर झालेल्या समन्वयानुसार आघाडीची पुनर्रचना झाली, तर भाजपसमोर आव्हान निर्माण होऊ शकते. आघाडी झाली, तर सामना सामूहिक विरोधकांशी आणि झाली नाही, तर भाजपमध्येच घरचा लढा, अशा दोन टोकाच्या शक्यता नागरिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एकंदरीतच, या प्रभागातील राजकीय समीकरणे रंजक बनली आहेत. विकासकामांचा हिशेब आणि स्थानिक नेतृत्वातील स्पर्धेमुळे या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

तुकडे नाहीत; पण गटबाजी ठळक

जुन्या प्रभाग 41 चे किरकोळ अपवाद वगळता मोठे तुकडे झालेले नाहीत. पूर्वी या भागात तीन भाजप व एक शिवसेनेच्या संगीता ठोसर नगरसेविका होत्या. मात्र, ठोसर यांनी भाजपमध्येच प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रभाग भाजपच्या दृष्टीने एकसंध असला, तरी गटबाजी मात्र स्पष्ट दिसत आहे.

नव्या समीकरणांचा उगम

पूर्वी भाजपचा एकहाती प्रभाव असलेल्या या प्रभागात आता भाजपविरोधी मतांची एकत्रीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत संपर्कात असल्याचे चर्चेत आहे. त्यामुळे या तिघांची स्थानिक आघाडी किंवा समन्वय घडल्यास भाजपसमोर तगडे आव्हान उभे करू शकतात, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT